@maharashtracity

आणखीन संख्या वाढण्याची शक्यता

मुंबई: गोवा येथून ४ जानेवारी रोजी मुंबईत परतलेल्या
कॉर्डेलिया क्रूझवरील (Cordelia cruise) १ हजार ८२७ प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका वैद्यकीय प्रयोगशाळेने ९९५ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १२३ प्रवासी कोविड बाधित (covid) असल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. मात्र उर्वरित प्रवाशांचे कोविड चाचणी अहवालही रात्री उशिराने दुसऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले असून त्यामध्ये १६ प्रवासी कोविड बाधित आढळून आल्याने कोविड बाधित प्रवाशांची संख्या १३९ वर गेली आहे.

कॉर्डेलिया क्रूझ हे मुंबईतून (Mumbai) १ हजार ८२७ प्रवाशांना घेऊन गोवा (Goa) येथे गेले होते. मात्र या क्रूझवरील प्रवासी कोविडबाधित असल्याचे समोर आल्याने गोवा सरकारने प्रवाशांसह सदर क्रूझला परत मुंबईला पाठवले होते. ही क्रूझ ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत दाखल झाली.

या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेऊन मुंबई महापालिकेने (BMC) तातडीने आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली. त्या सर्व प्रवाशांच्या दोन प्रयोगशाळांमार्फत तातडीने कोविड चाचण्या केल्या. दोन्ही वैद्यकीय प्रयोगशाळेने आपले चाचणी अहवाल दिले आहेत. त्यानुसार या प्रवाशांपैकी १३९ प्रवासी कोविड बाधित आढळून आले आहेत.

उर्वरित ८७२ प्रवाशांचे कोविड चाचणी अहवाल दुसऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ होणार आहे.

पालिकेने मंगळवारीच या क्रूझवरील कोविड बाधित ६० प्रवाशांना भायखळा येथील रीचर्डसन अँड कृड्स जंबो कोविड सेंटर व हॉटेल्समध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

या क्रूझवरील १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करून, त्यांच्या स्वॅबचे नमुने २ वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले होते. यासाठी महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ तसेच परिरक्षण खात्यातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार अशी संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. प्रवाशांची तपासणी करण्याची कार्यवाही पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु होती.

या क्रूझवरील ज्या प्रवाशांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत, अशा सर्व प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here