@maharashtracity
मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या २४ इमारती ‘सील’
मुंबई: कांदिवली (Kandivli) येथील वीणासंगीत सोसायटीमध्ये एका महिन्यात कोरोनाचे (corona) १४ रुग्ण आढळून आल्याने ही सोसायटीही ‘सील’ करण्यात आली आहे. सुदैवाने या १४ पैकी ८ रुग्ण हे बरे झाले आहेत. मात्र सर्व रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत.
मुंबईत (Mumbai) कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी काही ठिकाणी नागरिकांकडून हलगर्जीपणा होत असल्याने कोरोना बाधित रुग्ण १० ते २० च्या प्रमाणात आढळून येत आहेत. सध्या मुंबई शहर व उपनगरे भागात कोरोनाचे अधिक रुग्ण असल्याने ‘सील’ करण्यात आलेल्या इमारतींची संख्या २४ आहे.
यासंदर्भातील अशी माहिती आर-दक्षिणच्या साहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली.
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आल्याने रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत काहीशी घट होत आहे. झोपडपट्टी, चाळी या ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने झोपडपट्ट्या व चाळी या ‘सील’ मुक्त झाल्या आहेत.
मात्र कांदिवलीतील वीणासंगीत सोसायटीत गेल्या महिन्याभरात कोरोना बाधित १४ रुग्ण आढळून आल्याने नियमाने सदर इमारत ही पालिकेकडून ‘सील’ करण्यात आली आहे. सुदैवाने या १४ पैकी ८ रुग्ण बरे झाले आहेत. तर उर्वरित ६ रुग्णांवर पालिका आरोग्य विभागामार्फत उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने सील बंद करण्यात आलेल्या इमारतींची संख्या २४ वर गेली आहे. परिणामी पालिका आरोग्य यंत्रणेकडून इमारती भागात कोरोना निर्मूलनाबाबत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या सीलबंद इमारतींच्या संख्येत घट होण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.कोरोनाबाधित रुग्णांना योग्य ते उपचार देण्याबरोबरच इमारतीमधील राहिवाशांचीही आरोग्य तपासणी करून संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच, सदर इमारत सॅनिटाईज करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.