@maharashtracity

१,९०० इलेक्ट्रिक बसही सामील होणार – आदित्य ठाकरे

मुंबई: पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच २०० डबल डेकर बसगाड्या व १,९०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. २०२७ पर्यंत बेस्ट परिवहन विभागात १००% इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा असेल, अशी माहिती राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. (BEST will induct 100 per cent electric buses by 2027)

मुंबई महापालिका पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने विविध उपाययोजना करीत आहे. पर्यावरण स्नेही मुंबई घडविण्याच्या दृष्टीने राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात सोमवारी, वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन, ई-बस मिशन, अशा तीन महत्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. (Three MoU singed)

यावेळी आदित्य ठाकरे यांनी, वरीलप्रमाणे माहिती दिली.

याप्रसंगी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, खा.अरविंद सावंत, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सभागृह नेता विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटनेता राखी जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. अर्बन फॉरेस्ट (Urban Forest) ही संकल्पना वेगाने राबवली पाहिजे. ग्रीन एनर्जी (Green Energy) वाढवली पाहिजे. राजकीय पक्षांनी आता पर्यावरणासाठी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ग्लोबल वार्मिंगमुळे (Global warming) जगातील पर्यावरण धोक्यात आले आहे. मुंबईतील पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातुन मुंबई महापालिकेने पुढाकार घेत विविध उपाययोजना, उपक्रम, योजना हाती घेतल्या आहेत.

मुंबईकरांच्या वाहतूक सुविधेसाठी बेस्ट उपक्रमात २०२८ पर्यंत बसेसची संख्या तब्बल दहा हजारांवर नेली जाणार आहे. बेस्टच्या परिवहन विभागात यापुढे सर्व बसगाड्या या पर्यावरणाला पूरक अशा इलेक्ट्रिक स्वरूपाच्या असतील, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या बेस्ट ताफ्यात ३२४२ बसगाड्या याआहेत. तसेच, एक हजार बसगाड्या भाडे तत्त्वावरील आहेत.

वुमन फॉर क्लायमेट

वुमन फॉर क्लायमेट या उपक्रमासाठी २५ महिलांची निवड केली जाणार आहे. (25 women will be selected for Women For Climate project) मुंबईत पर्यावरण संरक्षण व संवर्धन उपक्रमांत पुढाकार घेण्यासाठी, विविध उपाययोजना सुचवून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी महिलांचे नेतृत्व विकसित करण्यात येणार आहे.

सिटीज् फॉर फॉरेस्टस्

सिटीज् फॉर फॉरेस्टस् (Cities for Forest) या वनसंरक्षण, वृक्षारोपण, वन व्यवस्थापनाशी निगडित करारावर जगभरातील ५७ शहरांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता यामध्ये, मुंबईचाही समावेश करण्यात आलेला आहे.

या उपक्रमाला मुंबईमध्ये चालना देण्यासाठी आणि मुंबईकरांचा सहभाग वाढवण्यासाठी रेडिओ मिर्ची एंटरटेनमेंट नेटवर्कद्वारे जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here