@maharashtracity
संसर्गाची चिंता वाढली
मुंबई: राज्यात सोमवारी १,४२६ कोरोना रुग्णांचे (corona patients) तर २६ ओमिक्रॉन (omicron) रुग्णांचे निदान करण्यात आले. तर मुंबईत ७८८ कोरोना रुग्ण आणि ११ ओमिक्रॉन रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दोन्ही रुग्णसंख्या पाहता राज्यात चिंतनीय स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी ७७६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी असले तरीही या संख्येच्या सुमारे दुप्पट संख्येने कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०३,७३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६६ टक्के एवढे झाले आहे.
तसेच राज्यात सोमवारी २१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८५,४९,१३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५९,३१४ (९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
तर सध्या राज्यात ९१,४६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर ८८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. याचवेळी एकट्या मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात एका दिवसात ७८८ कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७७१६९८ एवढी झाली आहे. तर सोमवारी मुंबईत तिघांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यू संख्या १६३७३ एवढी झाली आहे.
राज्यात २६ ओमीक्रॉन बाधित रुग्णांची भर :
राज्यात सोमवारी २६ नवीन ओमीक्रोन बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात मुंबई येथे ११, रायगड (पनवेल मनपा) ५, ठाणे मनपा ४, नांदेड २, नागपूर, पालघर, भिवंडी, निजामपूर मनपा आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी १ रुग्ण आढळले असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
आतापर्यंत राज्यात ओमीक्रॉन रुग्णांची संख्या १६७ झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या रुग्णांपैकी ७२ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सोमवारी आढळलेल्या २६ ओमीक्रोन रुग्णांमध्ये १८ वर्षाखालील ४ रुग्ण, ६० वर्षावरील २ रुग्ण, १४ पुरुष, १२ स्त्रिया तर १८ वर्षाखालील ४ जण व इतर ३ जण वगळता १९ जणांचे पूर्ण लसीकरण झालेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.