तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
By मिलिंद माने
महाड (रायगड): महाड (Mahad) तालुक्यात कांबळेतर्फे महाड गावाजवळ पोलिसांनी जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करत असताना झालेल्या स्फोटात दोन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर महाड ग्रामीण रुग्णालयात (Mahad Rural Hospital) प्राथमिक उपचार करून मुंबई (Mumbai) येथे हलवण्यात आले आहे. हा मुद्देमाल कांबळे येथील एका दगड खाणीत नष्ट करताना अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये (Mahad MIDC Police Station) पूर्वी जप्त केलेला विस्फोटक (explosive) मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर कांबळे तर्फे महाड येथील एका दगड खाणीत हा मुद्देमाल नष्ट करत असताना मोठा स्पोर्ट झाला. या स्फोटांमध्ये अलिबाग (Alibaug) येथून आलेले तीन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी (police injured) झाले आहेत.
राहुल दोशी, रमेश कुटे, आशीर्वाद लगदे अशी जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. या स्फोटामुळे परिसरातील कांबळे तर्फे महाड आकले, भोराव आदि गावात मोठे दणके बसले. या धक्क्याने गावातील घरेदेखील हादरली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
आवाज होताच गावातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी प्रतिमा पुडलवाड, तहसीलदार सुरेश काशीद आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. ही घटना घडत असताना सुरक्षेची उपाययोजना केली होती अगर नाही, याबाबत स्थानिक नागरिकांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.