@maharashtracity

उस्मानाबाद 2 तर मुंबईत बुलडाडाण्यातील प्रत्येकी एक रुग्ण

मुंबई: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NVI) बुधवारी दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी 4 रुग्ण ओमिक्रोनबाधित (Omicron) आढळले आहेत. यापैकी 2 रुग्ण उस्मानाबाद, 1 रुग्ण मुंबई येथील तर 1 रुग्ण बुलढाणा येथील आहे. यातील 3 रुग्णांचा परदेशी प्रवासाचा इतिहास आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 32 ओमिक्रोन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई 13 (Mumbai), पिंपरी चिंचवड 10 (Pimpri-Chinchwad), पुणे मनपा 2 (Pune), उस्मानाबाद 2 (Osmanabad), कल्याण डोंबिवली 1 (Kalyan-Dombivli), नागपूर 1 (Nagpur), लातूर 1 (Latur), वसई- विरार 1 (Vasai-Virar) आणि बुलढाणा 1 (Buldana) रुग्णांचा समावेश आहे.

यापैकी 25 रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर (RT-PCR test) चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या 4 रुग्णांचे नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले होते. या 4 रुग्णांपैकी 1 स्त्री तर 3 पुरुष असून ते 16 वर्षे ते 67 वर्षे वयोगटातील आहेत. सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत.

उस्मानाबाद येथील एका रुग्णाने शारजा (Sharjah) प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण त्याचा निकटसहवासित आहे. बुलढाणा येथील रुग्णाने दुबई (Dubai) प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्तीने आयर्लंड (Ireland) प्रवास केला आहे.

या पैकी 3 रुग्णांचे लसीकरण (vaccination) पूर्ण झाले आहे तर एक रुग्ण लसीकरणास पात्र नाही. सर्व रुग्ण रुग्णालयात विलगीकरणात (quarantine) असून त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 447 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठविण्यात आले आहेत. यापैकी 32 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here