@maharashtracity

१४ वर्षीय लहान मुलाची प्रकृती गंभीर

मुंबईतील लिफ्टची समस्या ऐरणीवर

मुंबई: अंधेरी ( पूर्व) येथे एसआरए इमारतीमध्ये (SRA building) लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ अल्पवयीन मुले आणि २ महिला असे ५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. या सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या लिफ्ट दुर्घटनेच्या (lift accident) घटनेनंतर मुंबईतील लिफ्टच्या समस्यांबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिका व अग्निशमन दलाच्या (fire brigade) नियमानुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीमधील लिफ्टची नियमित देखभाल- दुरुस्ती करणे बंधनकारक असून त्याची जबाबदारी इमारतीचे व्यवस्थापन बघणाऱ्या रहिवाशी, सोसायटीची असते.

मुंबई महापालिकेकडून (BMC) प्राप्त माहितीनुसार, अंधेरी ( पूर्व), आझाद रोड, गुंदवली गावठाण येथील महाकाली दर्शन या तळमजला अधिक १६ मजली एसआरए इमारतीमध्ये सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना इमारतीची लिफ्ट अचानक खाली कोसळली. त्यामुळे मोठा आवाज होऊन खळबळ उडाली.

नेमका कशाचा आवाज झाला, काय घडले व कसे काय घडले हे समजण्यापूर्वी लिफ्टमधील नागरिकांची आरडाओरड झाली. त्यामुळे नागरिकांनी व रहिवाशांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. कोणीतरी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.

या दुर्घटनेमुळे लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी अवस्थेतील तुषार चव्हाण (१४) , शुभम गोसावी (१५), अभिषेक पवार (१५), या ३ अल्पवयीन मुलांसह प्रियांका पांचाळ (५०/ महिला) आणि संगीत पवार (४२/ महिला) या ५ जणांना लिफ्टमधून अथक प्रयत्नांनी बाहेर काढून त्यांना तात्काळ नजीकच्या रूग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या सर्व जखमींना नजीकच्या आदित्य नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तुषार चव्हाण हा मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर शस्त्रीक्रीया करण्यात येणार असल्याने त्याला तात्काळ नजीकच्या आनंद या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.

बाकी ४ जखमींची प्रकृती स्थिर असून ते तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. जखमी अभिषेक पवार हा संगीता पवार यांचा मुलगा असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here