@maharashtracity
मुंबई: अंधेरी (प.), सिटी मॉलजवळील लक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेट येथे एका गाळयात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीवर तब्बल चार तासांनी नियंत्रण मिळवून ती पूर्णपणे विझविण्यासाठी अग्निशमन दलाला चार तासांचा कालावधी लागला. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. (Shop gutted in fire in Andheri)
प्राप्त माहितीनुसार, अंधेरी (प.), सिटी मॉलजवळ असलेल्या लक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये येथे एका गाळयात मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास धूर निघून आग लागली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, काही कालावधीत या गाळ्यातील आग भडकली व तिने भीषण रूप धारण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी ४.१० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाने ही आग स्तर दोनची असल्याचे जाहीर केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन, ८ जंबो वॉटर टँकर व १ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवले. अखेर सकाळी ६.५५ वाजताच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, गाळ्यातील कार्यालय, सामान आदीं जळाल्याने वित्तीय हानी झाली.
ही आग का व कशी काय लागली, आगीचे कारण काय, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी हे तपास करीत आहेत.