कोल्हापूर: गुरूवार संध्याकाळ…सकाळपासूनच पाऊस संततधार.. म्हटल तर धुवाँधार!असा पाऊस कोल्हापूर विशेषतः पश्चिम भागाला काही नवीन नाही.उभ्या आडव्या झोडपणाऱ्या पावसाची आम्हाला सवय आहे.
एक जूनला रेनकोट डिकीत ठेवला की दसऱ्यानंतरच घडी घालून ठेवायचा हा आमचा जुना रिवाज.रंकाळ्यावरचा छत्री उलटी करणारा पाऊस आमच्या ओळखीचा.ज्योतिबाच्या डोंगरवाटेवर तर छत्री टीकायचीच नाही.आज पावसामुळे दवाखान्यात जायला थोडा उशीरच झालाय. डी मार्ट पलीकडच्या कांबळे मामाच्या घरापासून पार्कींग केलेल्या वाहनांची ही Ss गर्दी. टॉवरपर्यंत कसाबसा पोचलो.रंकाळा ओव्हरफ्लो.टॉवर शेजारच्या सज्जांमधून पाण्याचे प्रवाह.लोकांचा उत्साह ओसंडून वहातोय.भरपावसात हे चित्र कॅमेऱ्यात टीपण्यासाठी चढाओढ.
गर्दीतून कसाबसा बाहेर पडलो.जॉकी बिल्डींग ओलांडून, नापा हायस्कूलच्या मागच्या गेटसमोरच्या पाण्यातून कशीबशी वाट काढतं साकोली पार केली… अजूनही पाण्याच्या लोंढ्यातून वाट काढत उत्साही मंडळी रंकाळ्याकडे जातायतचं… त्यांचा उत्साह नैसर्गिक आहे..ताराबाई रोडवरच्या घोट्यापेक्षा जास्त पाण्यातून वाट काढता काढता रंकाळा मनात तरळू लागला…रंकाळा टॉवरच्या बाजूनेओव्हरफ्लो होणं हे सेलीब्रेशन आहे?नयन मनोहर दृश्य म्हणून ठीक आहे.पण मला मात्र हे दृश्य अस्वस्थ करून गेलं… २५ जुलै २००५ साली पण असचं अस्वस्थ वाटलं आणि आजही…कुणीतरी पाण्यात पालथ पाडून… वरून पाणी मारल्यावर जसं गुदमरायला होतं तसं..होय! रंकाळा असा अनैसर्गिक ओव्हरफ्लो होणं.. हे प्रत्येक रंकाळा प्रेमीला अस्वस्थ करणारचं आहे…किमान पस्तीस वर्ष झाली रोजच रंकाळ्याचा निकट सहवास आहे.
पहाटेचा रंकाळा हा आमचाच असतो..मग दिवसभर इतरांचा..रोज घरून दवाखान्यात जातायेता चार वेळा रंकाळा दर्शन होतच होतं.गेल्या तीन तपात रंकाळ्याच्या अनेक घडामोडी अनुभवल्या आहेत…खरंतर रंकाळा हा तलाव नाही.. जलसंचय… जलवितरण यांचे धरणसदृश्य सर्वांगसुंदर जलस्थापत्त्य आहे…त्याची स्वतःची एक रचना आहे…आणि त्याच्या पाण्याच्या प्रवाहांचे रंकाळ्याच्या बाहेरही खेळकर अंगण आहे…तांबट कमानीच्या अलीकडे पासून ते पार अंबाई टँक पर्यंत अर्धचंद्राकृती हा बंधारा हा रंकाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा आधार आहे…संरक्षण आहे… रंकाळ्यात सर्व बाजूनी येणाऱ्या पाण्याला हा बंधारा थोपवतो तोलून धरतो…पाणी क्षमतेपेक्षा जास्त झालेच तर या दगडी बांधणीवर दबाव न येता आणि खालच्या वस्तीलाही धोका न पोचवता पाण्याची योग्य ती निर्गत करणारी यंत्रणा या बंधाराच्या पोटातच आहे! आणि ती ही योग्य ठीकाणी…मुख्य घाटावरच्या पायऱ्यांच्या दोहो बाजूला बिडाच्या भक्कम (कधीच न गंजलेल्या) जाळ्या आहेत.
पायऱ्यांच्या वरच्या अंगाला मोठ्ठी बिडाची जाळी आहे…विशिष्ठ उंचीपेक्षा जास्त पाणी साठलं की या अंतर्गत रचनेच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी भूमी खालून नदीच्या दिशेने प्रवाहीत होते… जाऊळाच्या गणपतीच्या पुढच्या अंगालाअनुगामिनीकडे वळताना याचा प्रत्यय आपल्याला येतो. वीज, डीझेलपंप अशा कोणत्याही बाह्य ताकदीशिवाय धोबी घाटासाठी येणारे पाणी आणि त्याच्याशेजारचे सातत्याने भरलेले दगडी कुंड त्याची आपल्याला साक्ष देते..धुण्याच्या चावीची रचना तर एकमेवाद्वितीय आहे..रंकाळ्यातील पाण्याच्या निर्गतीच्या आणि वापराच्या कल्पक स्थापत्याची जपणूक करण्यात आपण कमी पडतोय म्हणून तर रंकाळा ओव्हरफ्लो होतोय.
याचे सेलीब्रेशन करतांना आपल्या मनात विचार का येत नाही?तीच गत उत्तरेच्या बाजूची.. रंकाळ्यावर फिरायला येणारा प्रत्येक जण डीमार्ट समोरचं मोठ झाडं ओलांडलं की रंकाळयाकडील भिंतीच्या बाजूला लागुन असलेली एक चौकोनी जाळी ओलांडून पुढे जातो… कोणी याकडे फारसं लक्ष देत नाही… इथून प्रवाहीत होणारं पाणी कित्येक एकर शेती पिकवायंच हे कुणाच्या गावीही नाही…रस्त्यापलीकडचा आडवा पाट तर ओतातल्या इमारतींच्या बांधकामामुळे केंव्हाच नामशेष झालाय..आणि हो… जाऊळाच्या गणपतीपासून ते शालीनी पॅलेस ओलांडेपर्यंतचा गगनबावडा रस्ता हा खरंतर रंकाळयाचा भराव आहे… नदीसपाटीपर्यंत त्याचे चार टप्पे आहेत.
यांच्या पोटात जलनिर्गतीची काही रचना आहे… सन २००८ साली सर्व आधुनिक यंत्रणांद्वारे आयआरबीने रस्ता केला आणि आजच्या डीमार्ट समोर तो कित्येक फूट खचला याचा आपण कधी विचार केलाच नाही..मग आतली पोकळी भरण्यासाठी कित्येक टन सिमेंट या भरावाच्या पोटात आपण ओतलं.. तेंव्हा रंकाळ्याच्या स्थापत्त्याचा अभ्यास आपण केलाच नाही…तीच गतपाश्चिमेकडच्या निर्गत व्यवस्थेची..पदपथ उद्यानाची भिंत बांधताना रंकाळ्याच्या या बाजूला पसरणाऱ्या पाण्याचा विचार झालाच नाही…माळगल्ली, घोलकर वाड्याच्या बाजूला फरशीवर पूल बांधताना त्याची लांबी किती असावी… दोन्ही बाजूला भर किती असावी याचा विचार झालाच नाही… परताळ्याविषयी तर न बोललेलेच बरे.. इराणी खण ते जुना वाशी नाका आणि पुढे सध्या मठापर्यंत मेन ड्रेनेज लाईनसाठी उकरतांना काय काय सापडलं आणि बुजवलं ते आठवून पहा..जाऊ दे रंकाळ्याच्या स्थापत्त्याचे दुर्लक्षित आणि अवहेलना झालेले सगळेच तपशील मांडणं म्हणजे एक पुस्तकच तयार होईल..पण रंकाळा ओव्हरफ्लो झाला म्हणून आपण सारेच रंकाळ्यावर धावलो आणि सेल्फीसाठी धडपडलो म्हणून हे सारं उफाळून वर आलं..
मग आपणचं ठरवा रंकाळा असा ओसंडून वहाणं हे सेलीब्रेशन आहे काय?
डॉ. अमर अडके
समस्त रंकाळा प्रेमींच्या वतीने