@maharashtracity
मुंबई अग्निशमन दलाचा प्राथमिक चौकशी अहवाल
मालक व भाडेकरुंना बजावली नोटीस
मुंबई: करी रोड रेल्वे स्थानक येथील ‘अविघ्न’ टॉवरमधील १९ व्या मजल्यावर २२ ऑक्टोबर रोजी लागलेल्या भीषण आगीला ‘शॉर्टसर्किट’ कारणीभूत असल्याचा निष्कर्ष मुंबई अग्निशमन दलाच्या प्राथमिक चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. (Primary findings : Short circuit responsible for fire at Avighna Tower)
या टॉवरमधील आग प्रतिबंधक यंत्रणा नादुरुस्त असल्याने मालक व भाडेकरू यांच्या विरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात यापूर्वीच एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. आता या टॉवरमधील भाडेकरू व मालक यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबई अग्निशमन दलाने केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल मंगळवारी पार पडलेल्या पालिका स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.
‘अविघ्न’ टॉवरमध्ये २२ ऑक्टोबर रोजी भीषण आग लागून एका सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेत उमटले होते. या आगीच्या घटनेची मुंबई अग्निशमन दलाने प्राथमिक चौकशी केली असता या टॉवरमधील १९ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १९०२ मधील मेन इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन बोर्डात शार्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले होते. तसेच, सदर भीषण आगीवर अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवून आग विझविली होती.
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू असताना या टॉवरमधील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे व इमारतीतील पाण्याचा दाब योग्य नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. तसेच, या टॉवरमधील फ्लॅट क्रमांक १९०२ मधील सदोष वायरींगमुळे शॉर्टसर्किट झाले असून त्यामुळेच आगीचा भडका उडाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला सदर अहवाल सादर करण्यात येणार आहे.