@maharashtracity

अद्यावत प्रोटॉनबीम थेरपीचा वापर करणार

सल्लागाराची नेमणूक करणार

गरीब कॅन्सर रुग्णांना माफक दरात उपचार

प्रोटॉनबीम थेरपी केवळ कॅन्सर पेशी व ट्युमरला लक्ष्य करणार

मुंबई: मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेने मुंबईतून जीवघेण्या कॅन्सर रोगाला हद्दपार करून कॅन्सरने पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर कृती आराखडा तयार केला आहे. (BMC prepared plan to eradicate cancer from Mumbai)

कॅन्सर पीडित रुग्णांना (cancer patients)
अद्यावत वैद्यकीय सुविधा, औषधोपचार देऊन त्यांना कॅन्सरमुक्त करण्यासाठी पालिकेने जणू काही ‘विडा’च उचलला आहे. पालिका लवकरच “अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटर” ची स्थापना करणार असून त्यासाठी एका सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. (BMC to set up Cancer Care Centre)

कॅन्सर आजाराने पिडीत गरीब, दुर्बल घटकातील रुग्णांना अचूक, अत्याधुनिक, किफायतशीर दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अद्यावत, “प्रोटॉनबीम थेरपी”चा (proton beam therapy) वापर करण्यात येणार आहे.

या उपचार पद्धतीत, कमीत कमी डोस देऊन अधिकाधिक कॅन्सर रोगाच्या पेशी नष्ट केल्या जाणार आहेत. केमोथेरपीचे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करणारी व केवळ ट्युमरला लक्ष्य करणारी रेडिएशन प्रकारातील “प्रोटॉनबीम थेरपी” ही कॅन्सरवर सर्वात अत्याधुनिक व प्रभावी उपचारपद्धती मानली जाते.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने जीवघेण्या कोरोनाची पहिली, दुसरी लाट रोखली असून तिसऱ्या लाटेला प्रवेश नाकारला आहे. पालिकेने मुंबईतून टीबीला (TB) हद्दपार करण्यासाठी पावले उचलली आहेत. आता मुंबईमधून कॅन्सरला हद्दपार करण्यासाठी लवकरच आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

१०० कोटींच्या “कॅन्सर केअर सेंटर” साठी २.८० कोटींचा सल्लागार

कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी व यशस्वी औषधोपचार करण्यासाठी पालिका किमान १०० कोटी रुपये खर्चून “अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटर” ची स्थापना करणार आहे.

या अंतर्गत कॅन्सरग्रस्त रुग्णांना “प्रोटॉनबीम थेरपी” द्वारे उपचार देण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक तांत्रिक तपशील, यंत्र सामग्री तयार करणे, या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करणे, हा प्रकल्प नियोजित कालावधीत सुरू करून पूर्ण करणे, प्रकल्पासाठी अंदाजे ३ एकर जागा ( १० हजार चौ.मिटर) असलेला भूखंड उपलब्ध करणे, “प्रोटॉनबीम थेरपी”साठी सर्वेक्षण करणे, अत्याधुनिक उपकरणासाठी सहकार्य करणे, सॉलिड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग फायर प्रोटेक्शन फाईटिंग सिस्टीम आदी कामांसाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार’ म्हणून क्रसना डायग्नोस्टिक्स लि. यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यास पालिकेकडून या कामासाठी २ कोटी ८० लाख रुपये देण्यात येणार आहेत.

टाटा रुग्णालयावरील ताण कमी होणार

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात (Tata cancer Hospital) देशभरातून कॅन्सर आजाराने त्रस्त रुग्ण हे उपचरासाठी मुंबईत (Mumbai) येत असतात. त्यामुळे टाटा कॅन्सर रुग्णालयावर मोठा ताण येतो. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी पालिका राबविणार असलेल्या या प्रकल्पामुळे टाटा कॅन्सर रुग्णालयावर कॅन्सर पिडीत रुग्णांचा पडणार ताण कमी होण्यास फार मोठी मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here