हनुमान चालिसावरून आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला

@maharashtracity

मुंबई: मुंबईसह राज्यात सध्या हनुमान चालिसा पठण, मशिदीवरील भोंगे, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणे यावरून रणकंदन माजले आहे. मोठे राजकारण घडत आहे. अशातच राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी, धर्मावर, देवावर चर्चा होतच असते.

देव कसा असतो हे मी कोविड काळात जवळून पाहिले. रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण, नातेवाईक हे रुग्णालयाच्या दारात जी प्रार्थना करतात तीच खरी प्रार्थना असते. ती प्रार्थना देव व डॉक्टर कसे ऐकतात हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले, असे सांगत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, खा. गजानन कीर्तीकर, आ. सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, माजी नगरसेवक यशोधर फणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील महापालिका रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या व डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत कूपर रूग्णालय परिसरात नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर या तीन प्रमुख रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण विविध आजारांवर उपचारासाठी व शस्त्रक्रिया करण्यासाठी कर्जत, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, विरार आदी परिसरातून येत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे.

सरकारी रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नव्याने डॉक्टरांची संख्या वाढविणे आणि नवीन डॉक्टर घडविण्याची मोठी जबाबदारी राज्य शासनाची असताना मुंबई महापालिका (BMC) सध्या स्वतःबळावर केईएम, नायर व सायन रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय चालवत आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी बाहेरील डॉक्टरांना कंत्राटी तत्वावर रुग्णालयात कामाला लावून त्यांना भरमसाठ वेतन देत आहे.

यावर रामबाण उपाय म्हणजे शासनाने व पालिकेने नवीन डॉक्टर उपलब्ध करणे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे मुंबई महापालिकेवर स्वतः पुढाकार घेऊन कूपर रूग्णालय (Cooper Hospital) परिसरात वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारण्यात आली. या नवीन वैद्यकीय महाविद्यालयातून (Medical college) दरवर्षी २०० डॉक्टर घडवू शकणार आहेत.

राजकारणात शांतपणे काम करणे महत्वाचे

कोविड काळात (covid pandemic) पालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर रुग्णांना उपचार देण्याबाबत राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा थोडाफार दबाव आला असेल, पण तरीही ती डॉक्टरांनी डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले व त्यांना दिलासा दिला, हे मला जवळून अनुभवायला मिळाले. अगदी तसेच राजकारणातही डोक्यावर बर्फ ठेवून काम करणे महत्वाचे असते, हे मला आपल्या डॉक्टरांकडून शिकायला मिळाले, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पालिका रुग्णालयात दर्जेदार वैद्यकीय सेवा – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

कूपर रुग्णालयात पालिकेतर्फे चांगल्या व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळतील आणि त्याचा रुग्णांनाही त्याचा उपयोग होईल. मुंबई महापालिका दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात पहिला क्रमांक राखेल, असा आत्मविश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here