@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने भुलेश्वर, काळबादेवी, गिरगाव परिसरातील रस्ते, पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचा माल जप्त केला.
त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांनी व पादचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पालिकेच्या पथकाने रस्ते व पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या तब्बल ९२ फेरीवाल्यांवर अचानक कारवाई करून त्यांना पिटाळून लावले.
गिरगाव, काळबादेवी, भुलेश्वर आदी परिसरात रस्ते व पदपथावर अनेक फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटल्याने येथील पादचारी, स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून, पदपथावरून ये – जा करताना सदर फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागत असे. याबाबत काही तक्रारी आल्यानंतर पालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्याची गंभीर दखल घेऊन रस्ते, पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या ९२ फेरीवाल्यांवर अचानक धाड टाकून कारवाई केली. त्यामुळे फेरीवाल्यांची चांगलीच धावपळ झाली. काही फेरीवाल्यांनी कारवाई व माल जप्त न करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना विनंती केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
पालिकेच्या ‘सी’ विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता सदर फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले होते.
पालिकेच्या ‘सी’ विभागातील दवाबाजार परिसरात घाऊक बाजारपेठा, अनेक आस्थापनांची कार्यालये असल्याने या भागात कायम रहदारी व वर्दळ असते. वाढत्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
जगन्नाथ शंकरशेट मार्ग, पांजरापोळ, तीन बत्ती नाका, पाचवा कुंभारवाडा, मोती सिनेमा, दादीशेठ अग्यारी लेन, भूलेश्वर मार्ग, दवाबाजार, आत्माराम मर्चंट मार्ग, शेख मेमन मार्ग आदी परिसरांमध्ये ही कारवाई करुन सर्व रस्ते फेरीवालेमुक्त करण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सर्वश्री. संजय गोसावी तसेच तानाजी मोरे, निरीक्षक भय्यासाहेब पारधी, अमोल महाजन, जगदीश झोरे आणि रतिलाल जाधव यांच्यासह २४ कामगार तसेच पोलीसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील ही कारवाई सुरु राहणार आहे.