आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नांना यश
Twitter: @maharashtracity
नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाकरिता नगरविकास विभागाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेतून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेकडील निधीच्या कमतरतेमुळे हि कामे हाती घेण्यात येत नसल्याने नगरविकास विभागामार्फत या कॉक्रीटीकरणाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी लेखी मागणी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी केली होती.
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांना या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असल्याने या रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती.
मंजूर निधीतून अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मी नगर येथील मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता, साई सेक्शन मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयासमोरील रस्ता, माउली फर्निचर ते कलावती भवन प्लॉट नं.७८ पर्यंत जाणारा रस्ता, आंबेडकर नगर अंतर्गत विविध रस्त्यांचे कॉक्रीटीकरण तसेच अंबरनाथ पश्चिम येथील प्रभाग क्र.०८ बुवापाडा खदान, शारदा चौक ते पत्रा पेठीपर्यंत जाणारा रस्ता आणि चिखलोली सर्वोदय नगर, गणपत ढाबा ते शिवपार्ककडे जाणाऱ्या रस्त्याचे नगरविकास विभागाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेतून कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
या रस्त्यांचे कॉक्रीटीकरणामुळे नागरिकांना मोठा फायदा मिळणार असून विशेषतः महिला व जेष्ठ नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या त्रासातून सुटका मिळणार आहे.