@maharashtracity
पाचव्या सेरो सर्वेचा अहवाल प्रसिद्ध
मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) केलेल्या पाचव्या सेरो सर्वेत 86.64 टक्के मुंबईकरांमध्ये कोविड19 प्रतिपिंडे (Antibodies) आढळली आहे. यातून मुंबईकराना किंचित दिलासा मिळाला असला तरीही कोविड वर्तणुकीचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
या अहवालानुसार पूर्ण किंवा अंशत: लसीकरण (vaccination) झालेल्यांपैकी 90.26 टक्के नागरिकांमध्येही प्रतिपिंडे आढळली आहेत. तर लसीकरण न झालेल्यांपैकी 79.86 टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंड आढळली आहेत.
प्रतिपिंड आढळले तरी कोविडपासून पूर्ण सुरक्षा मिळण्याबाबत तज्ज्ञ साशंकता उपस्थित करत आहेत. त्यामुळे कोविड विषाणू संसर्ग होवू नये म्हणून मास्कचा योग्य उपयोग, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर इत्यादी कोविड अनुरुप वर्तणूकीचे पालन करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये आतापर्यंत तीनवेळा सेरो चाचणी करण्यात आली आहे. तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्यात आले आहे. या चार सर्वेक्षणानंतर, कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा रक्त नमुने विषयक सर्वेक्षण केले गेले.
18 वर्षांपेक्षा अधिक असलेल्या नागरिकांमध्ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे. महानगरपालिकेचे दवाखाने तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या विविध समाज घटकातील रुग्णांचा यामध्ये समावेश होता. अशा रितीने सर्व 24 विभागात मिळून एकूण 8 हजार 674 नागरिकांचे रक्त नमुने संकलित करुन त्याची चाचणी करण्यात आली.
पाचव्या सेरो सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे :
१) सर्वेक्षणात केलेल्या चाचण्यांपैकी एकूण 86.64 टक्के नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता
२) झोपडपट्टी परिसरांमध्ये सुमारे 87.02 टक्के तर बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 86.22 टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे
३) पुरुषांमध्ये 85.07 टक्के तर महिलांमध्ये 88.29 टक्के सेरो सकारात्मकता
४) लस घेतलेल्या 90.26 टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंड विकसित
५) लस न घेतलेल्या नागरिकांपैकी सुमारे 79.86 टक्के नागरिकांमध्येही प्रतिपिंड