@maharashtracity

केईएम रोटो-सोटो केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांचे आवाहन

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रमुख रुग्णालयांत जाऊन अवयव दान नोंदणी करावी. तसेच अवयव-दान नोंदणी केल्यावर त्याबाबतची माहिती जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना द्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या के. ई. एम. रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (रोटो-सोटो) केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.

दिनांक २७ नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव दान (National Organ Donation Day) दिनानिमित्त केईएम रोटो-सोटो केंद्रातील (KEM Rotto Sotto Center) कार्यक्रमादरम्यान डॉ. देशमुख बोलत होते. आपले डोनर कार्ड शक्य असल्यास आपल्या इन्स्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअप आदी सोशल मिडिया (social media) अकाउंटवर अपलोड करण्याचा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

दरम्यान, अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीवर साधारणपणे ६,७४८ गरजूंची नोंदणी आहे. यामध्ये प्रामुख्याने ५,३७४ मूत्रपिंड, ११९४ यकृत, १०१ हृदय, २१ फुफ्फुसे, ५३ स्वादुपिंड व ५ आतडे अशी प्रतीक्षायादीत नोंदणी करण्यात आले आहे.

रोटो-सोटो महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालिक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत सुमारे २० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. तर रोटो-सोटो आणि झेडटीसीसी केंद्राच्या समन्वयातून २०१७ पासून आतापर्यंत ५८० मेंदू मृत दात्यांकडून ७८० व्यक्तिंना मूत्रपिंड, ४८० व्यक्तिंना यकृत, १३० व्यक्तिंना हृदय, ४३ व्यक्तिंना फुप्फुसे, ६ व्यक्तिंना स्वादुपिंड, ३ व्यक्तिंना आतडे तर ४ हात दान करण्यात आले आहेत.

म्हणजे ५८० मेंदू मृत दात्यांकडून सुमारे १ हजार ४७५ व्यक्तिंना अवयवदान करण्यात आले. ५८० मेंदू मृत दात्यांपैकी २४२ दाते हे मुंबईतील आहेत. या २४२ दात्यांद्वारे २०१७ पासून ३१९ व्यक्तिंना मूत्रपिंड, १८५ व्यक्तिंना यकृत, ६७ व्यक्तिंना हृदय, २६ व्यक्तिंना फुप्फुसे, ६ व्यक्तिंना स्वादुपिंड, एका व्यक्तिला आतडे आणि एका व्यक्तिला दुहेरी हात दान करण्यात आला आहे.

म्हणजेच २४२ मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे ६०५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. पटवर्धन यांनी या दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here