By महेश काळे 

Twitter: @maharashtracity

वासंतीताई वेलणकर गेल्या.

नोव्हेंबर महिन्यातच त्यांचे मोठे बंधू डॉ. गिरीश वेलणकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वासंतीताईंना शुभेच्छा देणारी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांच्या कर्करोगाशी चालू असलेल्या झुंजीचा उल्लेख होता. तेव्हाच खरे तर मनात शंकेची पाल चुकचुकली होती. दुर्दैवाने ही शंका खरी ठरली. 

तसे म्हटले तर साठ हे वय जाण्याचे नक्कीच नव्हते. पण कर्करोग वयाकडे बघत नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

वासंती वेलणकर म्हणजेच सुमित्रा भांडारी ह्या भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व्ही. सतीश यांच्या भगिनी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या पत्नी. अर्थात अशी जरी त्यांची ओळख असली तरी देखील त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व होते. परभणी शहराचे भूषण असलेल्या वेलणकर या संघ समर्पित कुटुंबातील ही कन्या…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. परभणीसारख्या (Parbhani) तुलनेने एका छोट्या शहरात एका विद्यार्थिनीने अशा प्रकारे काम करणे ही तशी त्याकाळात खूप मोठी बाब होती. पण घरातील संस्कार आणि पाठिंब्याच्या बळावर अत्यंत धडाडीने त्यांनी हे काम केले.

मला आठवतेय १९८२ ची केव्हा तरी घटना असेल. त्यावेळी मी परभणीच्या शिवाजीनगर मधील मराठवाडा हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होतो. त्याचवेळी आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात एका धड्यामध्ये म. पै*बराबाबत चुकीचा उल्लेख आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. ठिकठिकाणी बंद, जाळपोळीच्या घटना, सक्तीने शाळा बंद पाडणे अशा अनेक घटना त्या काळात घडल्या होत्या. या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात एके दिवशी अचानक एक महाविद्यालयीन युवती आमच्या वर्गात आली. मी वासंती वेलणकर, अभाविप ची कार्यकर्ती असा परिचय करून देत तिने अवघ्या दहा मिनिटांत हा सगळा विषय आम्हा विद्यार्थ्यांसमोर मांडला.  तिची विषयाची मांडणी, आत्मविश्वास, देहबोली इतकी प्रभावी होती की, आज ४० वर्षानंतरही ही घटना अगदी जशीच्या तशी समोर येते. आजची ‘ सर त* से जुदा’ परिस्थिती पाहिली तर त्याकाळात शाळा – शाळांमध्ये जाऊन हा अत्यंत संवेदनशील विषय मांडणे किती धाडसाचे आणि धोकादायक होते हे लक्षात येते. 

ही एका अर्थाने वासंतीताईची पहिली ओळख…

त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्य करण्यासाठी मध्यप्रदेशातील बस्तरला गेल्याचे कळले.अर्थात त्यावेळी कल्याण आश्रमाचे काम, बस्तर मधील परिस्थिती याची फारशी ओळखही नव्हती आणि फारशी माहिती देखील. पण ८४-८५ ला बस्तर मध्ये जाऊन काम करणे किती आव्हानात्मक असेल याची आज सहज कल्पना करू शकतो. 

मधला खूप मोठा म्हणजे तब्बल ३५ पेक्षा अधिक वर्षांच्या काळात भेटण्याचा किंवा संपर्काचा योग आला नव्हता.  मात्र ३-४ वर्षांपूर्वी पुण्यात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत त्या कार्यरत असल्याचे कळल्याने मुद्दाम त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. अर्थात प्रत्यक्ष ओळखण्याचं तसं काहीच कारण नव्हतं.  गेल्यानंतर स्वाभाविकपणे परभणीतील जुन्या गप्पा झाल्या. आमच्या भेटीच्या काही महिने आधीच त्यांचे बंधू शिरीषजी यांचे असेच अकाली निधन झाले होते. त्यांची देखील आठवण झाली. कल्याण आश्रमाच्या त्यांच्या भानपुरी आणि नंतर रायपूर मधील शबरी कन्या छात्रावासातील वास्तव्याच्या देखील बऱ्याच आठवणी त्यांनी सांगितल्या. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींना कल्याण आश्रमाच्या कामाशी जोडण्यासंदर्भात देखील बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली. मात्र नंतरच्या काळात कोरोनामुळे सर्वच विषय मागे पडले. मध्यंतरी सहज विषय निघाला देखील, पण आता त्या संस्थेत नसल्याचे कळाले. 

आज तर त्यांच्या जाण्याची बातमी कानावर आली.

तसे पाहायला गेले तर संघाचा विचार, संघाचे कार्य वेगवेगळ्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी अक्षरशः हजारो कुटुंबे, लाखो कार्यकर्ते तन – मन – धनाने झटत असतात. कधी माध्यम बदलते, कधी वेग कमी जास्त होतो, पण सर्वजण आपल्या ध्येय मार्गावर आपापल्या पद्धतीने वाटचाल करत असतात. अनेक जण मधूनच आणि अकाली सोडून देखील जातात. संपर्क, ओळख कमी जास्त असली तरी अशी समाजासाठी जगणारी माणसं जाताना मनाला चुटपुट लावून, आपला प्रभाव सोडून जातातच…

वासंतीताई देखील अशाच गेल्या!!

वनवासी कल्याण आश्रमातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

(लेखक महेश काळे हे वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय सेवा प्रचार प्रमुख आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here