By डॉ जितेंद्र आव्हाड

@Awhadspeaks

कालच्या बाबासाहेबांच्या धर्मांतराबाबत आपण असे म्हणालात की, ” बाबासाहेबांना हिंदू धर्म मजबूत करायचा होता. त्यांना हिंदू धर्मातील जातीभेद हटवायचा होता; चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य नव्हती. पण, त्यांच्यावर आणि त्यांच्या समाजावर सातत्याने अन्याय झाला. त्यामुळेच नाईलाजाने बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी इच्छा नसताना धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घ्यावा लागला!” तुमचे हे विधान मलाच काय, परंतु माझ्यासारख्या तमाम उपेक्षित कष्टकरी आणि प्रामाणिकतेला आपला धर्म मानणाऱ्या वर्गाला दुखावणारे होते.

बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार होते. त्यामुळे त्यांचे वास्तव्य मध्य प्रदेशातील महू (Mau, Madhya Pradesh) येथे होते. बरे, ते महू काय होते; तर मिलिटरी हेड ऑफ वॉर असे त्याचे नाव. अर्थात लष्करी छावणी! या छावणीमध्येच भीमराव अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.

मध्य प्रदेशानंतर खूप कष्ट आणि असंख्य हाल अपेष्टा सोसत काहीकाळ दापोली गावातील कॅम्प दापोली, नंतर सातारा असे वास्तव्य करीत बाबासाहेबांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले आणि हे सगळे सुरु असताना त्यांचे शिक्षण अर्थातच मुंबईतील सरकारी शाळेत झाले.

शालेय शिक्षण घेताना आलेले कटू अनुभव, प्यायला पाणी नाही, बसायला बाक नाहीत; अशा स्थितीतही वर्गाच्या बाहेर बसूनही बाबासाहेब घडत गेले आणि तुमच्या- माझ्यासारख्या करोडो लोकांचं आयुष्य घडविण्यासाठी कटू अनुभवातूनही ते मोठे होत गेले.

सन १९१६ च्या दरम्यान बाबासाहेबांनी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) (National Dividend of India: A Historical And Analytical Study) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले. १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पी. एच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी) ची पदवी दिली. याच काळात त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून (London School of Economics) बार एट लाॅ पदवी घेतली. अन् तिथूनच त्यांनी भारतातील जातीच्या उतरंडीविरोधात लढा पुकारला. बडोदा संस्थानाच्या नोकरीतही केवळ जातीमुळे चपराशीदेखील त्यांना दूर लोटत होता. त्यांच्या अंगावर फाईल्स फेकून दिल्या जात होत्या. विषमतेचा हा राग त्यांनी आपल्या मनात साठवून ठेवला.

या विषमतेविरोधातील रागाला मुक्त करण्यासाठी ३१ जानेवारी, १९२० पासून ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. २० जुलै,१९२४ ला ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली तसेच ‘बहिष्कृत भारत’ पाक्षिक सुरू केले. आणखी एक ‘प्रबुद्ध भारत’ हे एक नवीन पाक्षिक सुरू केले. ही सर्व नियतकालिके बहिष्कृत वर्गाचा आवाज होती. त्यातूनच छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांनी १९२० साली आयोजित केलेल्या माणगाव परिषदेतूनच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याला सुरूवात केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच परिषदेत दलितांना बाबासाहेबांच्या रूपाने नेतृत्व मिळाल्याचे शाहू महाराज यांनी जाहीर केले.

२० मार्च १९२७ रोजी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, ”मानव योनीपेक्षा कमी मानलेल्या पशुपक्ष्यादी योनीतील जीवजंतूस या तळ्यावर पाणी पिण्यास हरकत नाही. मात्र, हे स्पृश्य लोक आपल्याच धर्मातील काही माणसांना त्याच चवदार तळ्यातील पाणी Chavdar Tale Satyagrah) घेण्यास बंदी करितात, असा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवल्याखेरीज राहणार नाही. या प्रश्नाचे उत्तर काय आहे, हे सर्वांनीच नीट समजून घेणे अत्यंत जरुरीचे आहे.”

पुढे २१ मार्च १९३० ला केलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहात भाषणात बाबासाहेब म्हणतात, “आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे.”

सन १९३२ च्या गोलमेज परिषदेपासून बाबासाहेबांच्या भूमिकेत स्पष्टवक्तेपणा दिसून आला आणि आजही हेच शाश्वत सत्य आहे की, राखीव मतदारसंघ सोडले तर दलितांना (Dalit) इतर प्रवर्गातून निवडून येणे अत्यंत अवघड आहे. याचा फटका तर आताचे मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) साहेबांना शिर्डी मतदारसंघातच बसलेला होता.

१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवले येथे बाबासाहेबानी घोषणा केली की, “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू (Hindu) म्हणून मरणार नाही.” त्याची कारणे त्यांनी आपल्या समाजबांधवांच्या उपेक्षा बघितल्याच; पण, त्या प्रत्यक्षात अनुभवल्यादेखील! त्यानंतर त्यांनी जगभरातील सर्व धार्मिक पुस्तके वाचून काढली; त्यांचा अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

आपल्या धर्मांतरामुळे देशावर होणाऱ्या ऐतिहासिक, सामाजिक परिणामांचा विचार करून भारताचा नकाशा बदलणार नाही, देशाच्या प्रगतीला वेगळे वळण लागणार नाही, याचा अभ्यास करून या देशातील चातुर्वर्ण्य विरोधात ज्यांनी पहिला आवाज उठविला. त्या बुद्धाने दिलेला वैज्ञानिक धम्म (Buddha Dharma) अंगीकारला. मे 1956 मधील बाबासाहेबांचे एक भाषण प्रसिद्ध आहे. त्यात पत्रकाराने प्रश्न विचारला होता की, तुम्हाला बौद्ध धर्म का आवडतो? या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, “मला बौद्ध धर्म आवडतो; कारण, जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे.” आणि विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी सीमोल्लंघन केले अन् हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्म स्वीकारला. आपल्या भाषणात ते म्हणतात, “मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे.”

ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य जगणार आहे. ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं, असे आवाहन त्यांनी जनसमुदायाला केलं आणि तो लाखोंचा जनसमुदाय एका क्षणात बौद्ध धम्माचा उपासक झाला. असे इतिहासात क्वचित घडते; याचा विसर कधीकाळी दलित पँथरमध्ये (Dalit Panther) सक्रीय असलेले लढवय्ये रामदास आठवले यांना पडला, हे दुर्दैवं आहे.

भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता – लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.

बाबासाहेब आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला. इ. स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत. हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते, हे आठवले सोयीस्करपणे विसरलेले दिसतात.

२५ डिसेंबर १९२७ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती (Manusmriti) जाळली. ते एक पुस्तक म्हणून जाळले नव्हते. तर ते हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी निर्माण केलेली चातुर्वर्ण्याची उतरंड समान पातळीवर आणण्याचा त्यांचा लढा होता. मनुस्मृती ही भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी राबवावी, याची दिशा दाखवणारी होती. मनुस्मृतीत स्त्रीला स्थानच नव्हते. समाजातील 97% वर्गाला शिक्षण देखील घेता आले नाही पाहिजे, असे त्यात लिहून ठेवले होते. अशी अन्याय करणारी पुस्तिका अस्तित्वात आहे, याचाच मूळात बाबासाहेबांना राग होता. ती जाळून त्यांनी राग व्यक्त केला आणि समाजाला नवीन दिशा द्यायला सुरूवात केली.

जगात जिथे जिथे विषमता असेल तिथे तिथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असेल. विषमतेविरोधातील लढ्याला बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श असेल. हे वास्तव सत्य आता कोणीच विसरू शकत नाही. आठवले हे आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व!. त्यांनी क्रांतिकारक अशा दलित पँथरमध्ये काम केले. तरीही त्यांच्या मुखातून असे काही तरी बाहेर पडावे, तेही धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला! हा निव्वळ योगायोग असेल, असे मला वाटत नाही.

ते काहीही म्हणोत आजही आमच्यासारखे कोट्यावधी घोषणेवरच प्रेम करतो अन् बाबासाहेबांनाच आपला बाप मानतो.

(लेखक डॉ जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अणि राज्याचे माजी मंत्री आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here