@maharashtracity

गणेश विसर्जनासाठी फक्त ५ – १० जणांना परवानगी

गणेशोत्सवासाठी पालिकेकडून कडक नियमावली

मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मुंबई महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवाबाबत काही कडक नियम लागू करीत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

मनपाने नमूद केले आहे की, कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे. घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची तर सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फुटांची असावी. गणेश आगमन व विसर्जन प्रसंगी लसीचे दोन डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झालेल्या गणेश भक्तांनाच परवानगी असणार आहे. मात्र कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी

घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडू मातीची असावी किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. तिस-या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन / मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई करण्यात आली आहे.

तसेच, गर्दीची ठिकाणे असलेल्या गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी, असे मंडळांना सूचित करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घेणे. घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे. गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी नेण्यात येऊ नये.

वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.

नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. महापालिकेतर्फे २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत.

मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिका कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here