@maharashtracity
दिवसभरात सुमारे दहा लाख लसीकरण
मुंबई: देशात लसीकरणात (vaccination) राज्याने अव्वल स्थान कायम ठेवलं असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक असून शुक्रवारी दिवसभरात सुमारे १० लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
यामुळे दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले.
यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस दिली होती. मात्र, हा विक्रम मोडून काढत राज्याने दिनांक २१ ऑगस्ट रोजी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांचे लसीकरण करून विक्रमी कामगिरी नोंदवली होती. त्यानंतर काल दि. २७ ऑगस्ट रोजी ९ लाख ९० हजार इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले आहे.