@maharashtracity

मुंबई: बेस्ट परिवहन विभागाच्या (BEST) बसगाडयांच्या टपावर सौर ऊर्जा पॅनल (Solar panel of rooftop of BEST buses) बसवून त्याद्वारे ऊर्जा संचय करून त्या ऊर्जेचा वापर बसमध्ये करण्याबाबत बेस्ट उपक्रम उदासीन असल्याचे समोर आले आहे.

बसगाडी अवजड वाहन आहे. बसगाडीच्या टपावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यासाठी पुरेशी जागा नाही. भारतात बसगाडीच्या टपावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्याबाबतचे तंत्रज्ञान अद्याप उपलब्ध झालेले नाही, असे उत्तर देत बेस्ट उपक्रमाने सौर ऊर्जा पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती करण्याबाबत आपली हतबलता व्यक्त केली आहे.

त्यासाठी, भारतातील विद्युत बसगाडयांची निर्मिती करणाऱ्या विविध व्यवसाय संस्थांच्या प्रतिनिधींचा हवाला बेस्ट उपक्रमाने दिला आहे.
बेस्ट उपक्रम अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. बेस्ट परिवहन विभागाच्या खर्चात बचत होण्यासाठी भाजप नगरसेविका आशा मराठे (BJP corporator Asha Marathe) यांनी, बेस्टच्या बसगाड्यांच्या टपावर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्याद्वारे ऊर्जा निर्मिती करून त्याचा वापर बसमध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेवरील उपकरणांसाठी करावा, असा ठराव २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मांडला होता. त्यास पालिका सभागृहाने मंजुरी दिली होती.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी या ठरावाला अनुमोदन दिले होते. मात्र, बेस्टने सौर ऊर्जा निर्मितीबाबत आपली उदासीनता व्यक्त केल्याने नगरसेविका आशा मराठे व गटनेते प्रभाकर शिंदे यांचा हिरमोड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here