@maharashtracity

महाड: महाडमध्ये 20 मार्च रोजी ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्षापासून साजरा होत आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे (corona pandemic) हा सोहळा साजरा झाला नव्हता. यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक (Bhim Sainik) चवदार तळे स्मृतीदिन सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री तसेच दिल्ली सरकारचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. राजेंद्रपाल गौतम (Dr Rajendrapal Gautam) हे देखील उपस्थित राहत आहेत.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी १९ – २० मार्च १९२७ आली ऐतिहासिक चवदार तळे येथे सामाजिक क्रांती (social revolution) केली. देशातील तमाम दलित (Dalit), शोषित, पीडित आणि तळागाळातील घटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा सार्वजनिक पाणवठ्यावर मिळावी याकरिता चवदार तळे येथे सत्याग्रह केला.

या दिनाचा स्मृतीदिन महाड (Mahad) क्रांती भूमीत साजरा केला जातो. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक दर वर्षी महाडला येऊन चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. यावर्षी देखील या क्रांती दिनाच्या निमित्ताने लाखो भीमसागर असणार असल्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP), बहुजन मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी (VBA), कोकण रिपब्लिकन पार्टी संघटना आदी आंबेडकरी चळवळीतील राजकीय आणि सामाजिक संस्थांचे सभा आयोजित केले आहेत. याकरिता महाड नगर प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

भीमसैनिकांना पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मंडप, भोजन व्यवस्था, विविध संस्थांकडून करण्यात आली आहे. यावर्षी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar), महाराष्ट्र शासनाचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आदी मंत्री या क्रांतीदिनास भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत.

सामाजिक मंत्र्यांची उपस्थिती

प्रबुद्ध राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष नागवंश गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष महाड क्रांती भूमीत सभेचे आयोजन केले जाते. यावर्षी चवदार तळे येथे ही सभा संपन्न होणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी दिल्ली सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री डॉ राजेंद्र पाल गौतम हे उपस्थित राहत आहेत. त्याचप्रमाणे तब्बल बहात्तर तास फलंदाजी करणाऱ्या विश्व विक्रमवीर क्रिकेटर सिद्धार्थ मोहिते तसेच एम. डी. एनर्जी पॉवर लिमिटेड लंडनचे श्याम राऊत, एनर्जी पॉवर लिमिटेडचे डायरेक्टर नवीन कपूर आदी मान्यवर उपस्थित राहत आहेत अशी माहिती नागवंश गौतम कांबळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here