@maharashtracity

दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात तरुणांना यश

महाड (रायगड): शिवजयंती निमित्त किल्ले रायगडवर (Raigad fort) भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने निघालेल्या दोन तरुणांची मोटारसायकल माझेरी घाटात सुमारे २०० फुट दरीत कोसळली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. गाडीवरचा संयम सुटल्याने हा प्रकार घडला आहे. दरीत कोसळलेल्या तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश मिळाले आहे. (Motorcycle accident)

महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी (Mahad Police) दिलेल्या माहितीनुसार भोंगवली ता. भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवरून एक गट निघाला होता. त्यातील एका मोटारसायकलवर असलेल्या केतन देसाई (२३) आणि किरण सुर्यवंशी (२०) यांची मोटारसायकल माझेरी घाटात खोल दरीत कोसळली. (Bike accident)

सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळल्याने जखमी झालेल्या तरुणांना बाहेर काढणे एक आव्हानच होते. मात्र, स्थानिक तरुणांनी अथक प्रयत्न करत दोघांना सुखरूप बाहेर काढले. या दोन जखमींना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात (mahad Rural Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पहाटेच्या सुमारास घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले.

या जखमी तरुणांना वाचवण्यासाठी पारमाची, वरंध, माझेरी आणि उंबर्डे मधील तरुण आणि ग्रामस्थ तसेच सर्व ट्रक चालक यांनी अथक मेहनत घेतली. समाजसेवक नागेश (उत्तम) देशमुख वरंध आणि समीर सुतार, रा. पारमाचीवाडी या दोन तरुणांनी देखील जीवाची बाजी लावून जखमी तरुणांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here