@vivekbhavsar

मुंबई: विधान परिषदेच्या १० जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. संख्या बळानुसार भारतीय जनता पक्षाचे (BJP) चार उमेदवार सहज निवडून येईल असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे. यातील दोन जागा पक्षाच्या निष्ठावंत (BJP loyalist) यांना दिल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले असल्याने २८७ सदस्यांच्या सभागृहातून वरिष्ठ सभागृहासाठी निवडून द्यायच्या या  निवडणुकीसाठी २६ मतांचा कोटा असेल.

विदर्भातील (Vidarbha) पक्षाचे आक्रमक आणि तेली अर्थात इतर मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करणारे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawabkule) यांना परिषदेतील विरोधी पक्षनेते पद दिले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू समजले जाणारे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना परिषदेवर पुन्हा संधी दिली जाणार असल्याचा दावा सूत्राने केला. तसे झाल्यास आणि दरेकर यांच्याकडेच विरोधी पक्षनेते कायम ठेवल्यास बावनकुळे यांच्या हाती काही लागणार नाही, असे म्हटले जात आहे.

दरेकर यांच्यानंतरचे दुसरे आयात नेते आणि फडणवीस यांचे विश्वासू प्रसाद लाड (Prasad Lad) यांनाही पुन्हा संधी दिली जाईल असा दावा केला जात आहे. उर्वरित दोन जागा मूळ भाजपायी अर्थात निष्ठावंत यांना दिल्या जातील, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

निवृत्त होत असलेले सुजितसिंह ठाकूर (Sujit Sinh Thakur) हे संघटनेतील ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, तब्येतीच्या कारणावरून त्यांना राजकारणात सक्रिय राहणे अशक्य झाल्याने ठाकूर यांना पुन्हा संधी मिळणार नाही. तर आर एस सिंह (Ramniwas Satyanarayan Singh) यांचे २ जानेवारी २०२२ रोजी निधन झाल्याने या ही जागेसाठी निष्ठावंत यांना संधी दिली जाईल, असे म्हंटले जात आहे. सिंह हे देखील आयात उमेदवार होते.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाशिव उर्फ सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि शिव संग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) हे भाजपच्या चिन्हावर परिषदेत निवडून गेले होते. यावेळी दोघांचाही पत्ता कापला जाणार आहे. मेटे यांनी गेले दोन वर्षे भाजप विरोधात काम केले असा आरोप केला जातो.

दरम्यान, ज्यांना संधी मिळेल असे निष्ठावंत कोण असतील, याबाबत केवळ देवेंद्र फडणवीस सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया भाजप मधील एका वरिष्ठ नेत्याने दिली. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले पंकजा मुंडे (Pankha Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), राम शिंदे (Ram Shinde) यासारखे अनेक निष्ठावंत आहेत. त्यांनाच पुन्हा संधी देणार की जे प्रतीक्षेत आहेत, तरुण आहेत आणि गेले अनेक वर्षे पक्षाचे काम करत करत आहेत, त्यांना संधी दिली जाईल, याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे या नेत्याने सांगितले.

दरम्यान, विधान परिषदेच्या १० जागा रिक्त झाल्याने २० जून रोजी निवडणूक होत आहे. २ जून रोजी कार्यक्रम घोषित होईल. ९ जून पर्यंत नांमकन दाखल करता येईल तर १३ जून ही माघारीची अंतिम मुदत आहे.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजित सिंह ठाकुर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि दिवंगत आर एस सिंह यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे दिवाकर रावते (Diwakar Raote) आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) निवृत्त होत आहेत. पैकी देसाई यांना पुन्हा संधी दिली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalakar) आणि संजय दौंड हे निवृत्त होत आहेत. पैकी, निंबाळकर यांना पुन्हा संधी देवून विधान परिषदेचे सभापतीपदी बसवले जाईल.

भाजपच्या चार जागा निवडून येतील तर माहविकास आघाडीच्या ६ जागा निवडून येतील. निकृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँगेसचा (Congress) एकही सदस्य नव्हता. यावेळी काँग्रेसला त्यांचा उमेदवार वरिष्ठ सभागृहत पाठवता येईल.

विधान सभेतून परिषदेवर गुप्त मतदान पद्धतीने सदस्य निवडून द्यायचा असल्याने निवडणूक झालीच तर मते फुटण्याची (cross voting) शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here