@maharashtracity

मुंबई: रेल्वे हद्दीतील नाले व कलव्हर्ट यांच्या सफाई कामांना वेग देऊन ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी पालिका व रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करावी व आढावा घ्यावा, असे आदेश पालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिले आहेत.

पावसाळा तोंडावर आलेला असताना मुंबईत सध्या पालिका, म्हाडा, रेल्वे इतर प्राधिकरण यांच्या हद्दीत नालेसफाईची (nullah safai) कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पालिकेकडून (BMC) आतापर्यंत ७० टक्केपेक्षाही जास्त नालेसफाई व मिठी नदी व इतर नद्यांमधील सफाई कामे झाल्याचा पालिकेचा दावा आहे.

मात्र मुंबईत मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्ग हद्दीत सध्या नाले व कलव्हर्ट यांची सफाई कामे कशा पद्धतीने सुरू आहेत याबाबत आढावा घेण्यासाठी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका व रेल्वे अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. त्यावेळी वेलरासू यांनी रेल्वे हद्दीतील नाले व कलव्हर्ट सफाई कामांची पाहणी करून आढावा घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) संजय महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मेस्त्री, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (शहर) प्रकाश सावर्डेकर, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पश्चिम उपनगरे) भाग्यवंत लाटे, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पूर्व उपनगरे) विभास आचरेकर तसेच उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (प्रचालन व परिरक्षण) प्रशांत तायशेट्ये, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) सुरेश पाखारे, वरिष्ठ विभागीय अभियंता अर्पण कुमार, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता प्रियांश अग्रवाल आणि इतर सर्व संबंधित अधिकारी, अभियंता यावेळी उपस्थित होते.

पावसाळ्यात दरवर्षी अतिवृष्टी (heavy rain) झाल्यास व समुद्राला मोठी भरती (high tide) असल्यास मुंबईतील सखल भागात व रेल्वे मार्गावर पाणी साचते. त्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन त्याचा प्रवाशांना, सामान्य मुंबईकरांना जास्त त्रास होतो. ही बाब लक्षात घेता मुंबई महापालिकेने शहर व उपनगरातील नद्या व नाले यांच्या सफाई कामांवर जोर दिला आहे. ३१ मे पूर्वी नद्या व नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

त्याचप्रमाणे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सायन, कुर्ला, वडाळा, चुनाभट्टी आदी भागात पाणी (waterlogging) साचते. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे ५३ कलव्हर्ट, पश्चिम रेल्वे मार्ग ४१ कलव्हर्ट व हार्बर रेल्वे मार्ग २२ कलव्हर्ट असे तिन्ही रेल्वे मार्गातील ११६ कलव्हर्ट, सीएसएमटी ते मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान १८ ठिकाणी असलेल्या बंदिस्त नाले, कलव्हर्ट यांची सफाईकामे तातडीने व नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी संबंधित पालिका व रेल्वे अधिकाऱ्यांना दिले.

तसेच, मध्य रेल्वे व हार्बर मार्गावर मिळून १८ ठिकाणी तर पश्चिम रेल्वे मार्गावर १० ठिकाणी याप्रमाणे एकूण २८ ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याची कामे वेगाने सुरु आहेत. जोरदार पावसाच्या प्रसंगी लोह मार्गांवर पाणी साचू नये आणि त्याचा वेगाने उपसा करता यावा, यासाठी हे पंप मदतकारक ठरणार आहेत.

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग मिळून एकूण १०४ ठिकाणी तर, पश्चिम रेल्वे मार्गावर २२ ठिकाणी अशा एकूण १२६ जागांवर रेल्वे प्रशासनाकडून झाडांच्या फांद्या छाटणी करण्याची कामे वेगात सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here