@maharashtracity
पालिका सकारत्मक
शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांची मागणी
मुंबई: मुंबईतील विविध खेळांत सहभागी खेळाडू जर खेळताना अचानक दुखापत होऊन जखमी झाल्यास आणि त्याची माहिती उपलब्ध झाल्यास पालिका रुग्णालयात त्यांच्यावर मोफत उपचार करण्याबाबत पालिकेने सकारत्मकता दर्शवली आहे. त्यामुळे मुंबईतील जखमी खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या होतकरू खेळाडूंना (players) खेळतांना अचानक दुखापत होते. त्यामुळे कधी कधी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. त्याचा खर्च मोठा असतो. तो त्यांना परवडत नाही. अशा खेळाडूंवर पालिकेने आपल्या रुग्णालयात मोफत उपचार करावेत, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर (Shiv Sena Corporator Samadhan Sarvankar) यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यावर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आदी विविध प्रकारचे खेळ खेळण्यात येतात. मात्र हे खेळ खेळताना त्यांच्या हाताला, पायाला, मानेला, पाठीच्या मणक्याला, नसांना, डोक्याला, कंबरेत कुठेही कमी – अधिक प्रमाणात दुखापत झाल्यास त्यांना नजीकच्या कोणत्याही खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेणे परवडत नाहीत.
दुखापत खूपच मोठी असल्यास तो खेळाडू कायमचा जायबंदी होऊ शकतो. त्यामुळे त्याची कारकीर्द धोक्यात येते अथवा येऊ शकते. तसेच, तो खेळाडू घरातील कर्ता पुरुष असल्यास त्याच्या व कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाल्यास त्याचाही त्याच्यावर आणखीन विपरित परिणाम होऊ शकतो. अशा गंभीर व कठीण प्रसंगी पालिकेने स्वतःहून त्यांना मोफत वैद्यकीय मदतीचा (medical help) हात पुढे केल्यास त्या जखमी खेळाडूंना मोठा दिलासा मिळू शकेल, असे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी म्हटले आहे.