@maharashtracity
मुंबई: मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण (vaccination) कार्यक्रमाला सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे १११ टक्के पहिला डोस देण्यात आला आहे. तर ९६ टक्के मुंबईकरांनी दुसरा डोस घेतला आहे. या दोन्ही पातळ्यावर पाहता सध्या सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांवर लस घेण्याऱ्यांची गर्दी रोडावली असल्याने पालिका लसीकरण केंद्र कमी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.
सध्या सुरू असलेल्या केंद्रांवरील मनुष्यबळ इतरत्र लसीकरण केंद्रांवर हलविण्यात येतील, असेही एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई (Mumbai) शहर सुरुवातीपासूनच लसीकरणात देशात अव्वल राहिली आहे. याच शहरात १११ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण झाले आहे. मुंबई व्यतिरिक्त मुंबई बाहेरुन येणाऱ्यांना देखील या ठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे. यात प्रवासी, मुंबई बाहेरील पण मुंबईत कामाला असलेले कर्मचारी येत आहेत. अशांना मिळून १११ टक्के लसीकरण करण्यात आले आहे.
आता लसीकरण केंद्रांवरील संख्या कमी होत आहे. काही लसीकरण केंद्रांवर लस घेण्यास येणाऱ्यांची दिवसभर वाट पहावी लागत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे दिवसभर या केंद्रांवर मनुष्यबळ अडकून राहते. मुंबईतील ४४० लसीकरण केंद्रांपैकी २७२ लसीकरण केंद्र ही पालिकेची असून पालिका क्षेत्राबाहेरील लस इच्छूक केंद्रावर येत असतात.
मात्र, दिवसेंदिवस त्यांची संख्या आता कमी होत आहे. यावर बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत बऱ्यापैकी लसीकरण झाले असून मोबाईल वाहनांतून तसेच शिबिरांतून लसीकरण सुरु ठेवण्याचा विचार आहे. तसेच लस घेऊ इच्छिणाऱ्यांच्या घराशेजारी त्यांच्या मागणीनुसार लस शिबिरांतून लस दिली जाऊ शकते. शिवाय अशा ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करण्यात येईल, असे संकेत पालिकेकडून मिळत आहेत.