@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रात आरोग्य केंद्रांची स्थापना, रुग्णालयांचा पुनर्विकास, उपनगरीय रुग्णालयातील सेवांवर भर, रुग्णांच्या घराच्या परिसरातच उपचार, प्रसुतीकेंद्रांची सुविधा यावर आरोग्य अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

मुंबईकरांना तातडीने उपचार आणि अद्ययावत उपचार प्रणाली मिळण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. कर्करोगाच्या रुग्णांना अद्ययावत उपचार पद्धत प्रोटॉन थेरपीची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ‘आरोग्य केंद्र आपल्या घराशेजारी’ या सुविधेची योजना महापालिकेकडून करण्यात येणार आहे.

यात महानगरपालिकेच्या प्राथमिक आराेग्य सेवेअंतर्गत २११ आराेग्य केंद्रे, १८९ दवाखाने, २७ प्रसुतीगृहे, माध्यमािक आराेग्य सेवेअंतर्गत १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये व तृतीय स्तरीय आराेग्य सेवेअंतर्गत ४ वैद्यकीय महाविद्यालये, ५ रुग्णालये आणि १ दंत महाविद्यालय आराेग्य सेवा प्रदान करण्यासाठी सर्वाेत्तम कार्य करत असल्याचे म्हटले आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासाच्या जागा वाढवल्या

वैद्यकीय क्षेत्रातील विविध तंत्रज्ञांसाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि वैद्यकीय पदवीधरांसाठी प्रगत वैद्यकीय कौशल्यांसाठी पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप्स हे अभ्यासक्रम अंतर्भूत केले आहेत. २०२१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी अभ्यासाच्या जागा ५५० वरुन ८०० केल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा ५४५ वरुन ६८३ तर अतिविशेषकृत विभागांच्या जागा ९७ वरुन ११४ इतक्या वाढविण्यात आल्या आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र

महापालिकेने नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करण्याची योजना केली आहे. यामुळे प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयावरील प्राथमिक उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा भार कमी होईल व त्यांना गंभीर आजाराने बाधित रुग्णावरील उपचारासाठी अधिक लक्ष देणे शक्य होईल.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात पहिल्या टप्प्यात एकूण १०० आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल. या केंद्रामध्ये प्रतिक्षालय, डॉक्टर्स, औषधालय, परिचारिका कक्ष व रुग्ण तपासणी कक्ष यांचा समावेश असेल. या केंद्रांमध्ये १३९ विविध प्रकारच्या चाचण्या तसेच क्ष-किरण चाचणी, सी.टी.स्कॅन, मॅमाेग्राफी इत्यादी चिकित्सा नाममात्र शुल्कावर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

या केंद्रावर टेलिमेडीसिनमार्फत केईएम, सायन, नायर व कूपर रुग्णालय येथील विशेष व अतिविशेष डाॅक्टरांचे सल्ले उपलब्ध हाेतील. तसेच मधुमेह, कर्कराेग, उच्च रक्तदाब, हदयराेग आदी आजारांचे तपाणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी १५० काेटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

नवीन सुरु होणारे प्रकल्प

  • नायर रुग्णालय येथील ऑन्कोलॉजी विभागाची इमारत
  • भांडुप येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय
  • डॉ. आंबेडकर रुग्णालय कांदिवली (प.) येथील सुपर स्पेशालिटी विभाग, पीएम सेंटर, धर्मशाळा आणि कर्मचारी व आरपी निवासस्थानांची इमारती हे नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत.
  • सिध्दार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास
  • लो. टि.म.स. रुग्णालयाचा दुसर्‍या टप्यातील पुनर्विकास
  • क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास
  • ओशिवरा प्रसुतीगृह
  • राजावाडी रुग्णालयाच्या अत्यावश्यक विभागाची इमारत
  • कामाठीपुरा येथील नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचे योजिले आहे.

या नवीन सुरु हाेणाऱ्या प्रकल्पांसाठी २६६०.५६ काेटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

लसीकरण

महाराष्ट्र राज्यात तसेच देशातील इतर माेठ्या शहरांच्या तुलनेत मुंबईची लसीकरणाची कामगिरी अव्वल आहे. १६ जानेवारी २०२१ पासून नागरिकांना काेविड-१९ लसीचे १.९४ काेटीपेक्षा जास्त डाेस दिले गेले आहेत. त्यापैकी १,०४,७६,९६८ नागरिकांना पहिला डाेस व ८७,०२,००५ नागरिकांना दुसरा डाेस मिळालेला आहे.

जानेवारी २०२२ पासून काेविड योद्धे व वृध्द व्यक्तींना २,२३,०९९ इतके बुस्टर डाेस देण्यात आले आहेत. तर १५-१८ वयाेगटातील मुलांना २,९३,९२२ इतके डाेस देण्यात आले आहे. कांजूरमार्ग येथे १.२० काेटी लस मात्रांसाठी २ डिग्री ते ८ डिग्री सेल्सिअस तापमान असलेले एक माेठे शीतगृह सुमारे ३.३१ काेटी इतक्या खर्चाने उभारण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here