@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने जेंडर बजेट अंतर्गत गरीब, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, बेघरांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ४०.६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब, गरजू, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गरीब व गरजू महिलांसाठी १९ कोटी रुपये

मुंबई महापालिकेने गरीब व गरजू महिलांसाठी १९ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. या अंतर्गत पात्र महिलांसाठी स्वयंरोजगार देण्यासाठी १०.४९ कोटी रुपये, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ४.८० कोटी रुपये, रोजगाराभिमुख प्रशिक्षण – ४० लाख रुपये, स्वयंसाहाय्यता बचतगटासाठी खेळते भांडवल ३.२०कोटी रुपये, स्वयंसाहाय्य गटांना कर्जावरील व्याजात अर्थसहाय्य – २४ लाख रुपये अशी एकूण १०.४९ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी १४.४० कोटी रुपये

पालिकेने दिव्यांग व्यक्तीची दखल घेऊन त्यांच्या उद्धारासाठी एकूण अर्थसंकल्पात १४ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. बस प्रवास भाड्यात दिव्यांग व्यक्तीना १०० टक्के सवलत देण्यासाठी ४.८० कोटी रुपये, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार देण्यासाठी २.४० कोटी रुपये, दिव्यांग व्यक्तींना स्वयंचलित साईड व्हीलसह स्कुटर देण्यासाठी ४ कोटी रुपये, पात्र दिव्यांग महिलांसाठी स्वयंरोजगार देण्यासाठी ३.२० कोटी रुपये तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.६४ कोटी रुपये

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रासाठी पालिकेने १ कोटी रुपयांची, रात्र निवाऱ्याकरिता आधार योजनेसाठी २.६० कोटी रुपये, आधार केंद्रासाठी १ कोटी ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वयोवृध्द, शिशुगृह केंद्र, बेघरांसाठी निवारे २.५४ कोटी रुपये

पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात वयोवृध्द, शिशुगृह केंद्र, बेघरांसाठी निवारे यांसाठी २.५४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here