@maharashtracity
मुंबई: ‘होळी’ साठी अनधिकृतपणे वृक्षतोड (illegal tree cutting) केल्यास संबंधित व्यक्तींना किमान एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे. तसेच, त्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येईल. दोषी व्यक्तीला किमान एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती मुंबई महापालिका (BMC) उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
‘होळी’चा (Holi) सण जवळ आला आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिकेने वारंवार जनजागृती केल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी जुने फर्निचर, सुकलेल्या काटक्या, पालापाचोळा, शेण्या आदींचा वापर करून पर्यावरणपूरक (environment friendly) होळी साजरी करण्यात येते.
मात्र, काही लोक होळीत जाळण्यासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करतात. वृक्षांची मोठी हानी करतात. बऱ्याचदा मोठमोठ्या झाडांच्या फांद्याही तोडल्या जातात. ही बाब लक्षात घेता पालिका उद्यान खात्याने ‘होळी’ साठी वृक्षतोड करण्यास सक्त मनाई केली आहे.
वास्तविक, पर्यावरण जपणे व जोपासणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. याअनुसार आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे देखील आवश्यक आहे. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत करण्यात आलेल्या विविध तरतुदींमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा कलम २१ अन्वये अपराध आहे.
यानुसार अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिकडून किमान एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, संबंधित व्यक्तीला एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
येत्या १७ मार्च २०२२ रोजीच्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. कोणत्याही प्रकारची अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘होळी’ च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास त्वरित कळवावे. यामुळे तात्काळ कारवाई करणे शक्य होईल, असेही आवाहन जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.