@maharashtracity
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार
मुंबई: मुंबई महापालिका (BMC schools) शाळांमध्ये संगणकीय युगात डिजिटल व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देऊन भारताची भावी पिढी घडविण्याचा अर्थ ‘संकल्प’ पालिका शिक्षण खात्याने तयार केला आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून त्यांना या आधुनिक युगात संगणक, टॅब, प्रोजेक्टर, व्हर्च्युअल क्लासरूम आदींच्या माध्यमातून डिझिटल शिक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याने सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.
पालिकेने विद्यार्थी व पालक यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाण्याची ओढ लक्षात घेऊन पालिकेने नर्सरीपासून ते इयत्ता १२ पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील गरीब, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी कर्ज काढून परदेशात जाण्याची गरज भासू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा संकल्प पालिका शिक्षण खात्याने सोडला आहे.
जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण (education of international standard) देण्यासाठी खास शाळा व वर्ग सुरू करण्यात येत आहेत.
मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार ३७० कोटी २४ लाख रुपये आकारमान असलेला अर्थसंकल्प सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला.
यामध्ये, महसुली उत्पन्न २८७०.२४ कोटी रुपये, महसुली खर्च २८७०.२४ कोटी रुपये, तर भांडवली खर्च ५०० कोटी रुपये दाखविण्यात आलेला आहे.
या अर्थसंकल्पात, विद्यार्थ्यांना आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळांमधून आधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे. गणवेश, शिक्षण साहित्य, मोफत टॅब (Tab) आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई- लायब्ररी (e-library), देण्यासाठी भरीव तरतुद केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी टॅब देण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.