@maharashtracity

२२७ वार्डात प्रत्येकी २ दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल मिळणार

सायकलसाठी पालिका १००% अनुदान देणार

४०% किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड आवश्यक

मुंबई: मुंबईतील रहिवासी असलेल्या कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला (४०% त्यापेक्षा अधिक) स्वयंरोजगारासाठी मुंबई महापालिकेतर्फे (BMC) प्रत्येकी ४० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल (e-cycle) मोफत देण्यात येणार आहे.

मात्र, त्यासाठी १८ ते ६० वयातील दिव्यांग (Divyang) व्यक्ती ४०% अथवा त्यापेक्षाही अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत, आधारकार्ड (Aadhaar Card), शासकीय, खासगी नोकरीत नसल्याचे हमीपत्र, रहिवासी दाखला (Domicile Certificate), रेशनकार्ड (Ration Card) आदी पुरावे अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

त्यामुळे मुंबईतील बेरोजगार दिव्यांग व्यक्तीना स्वयंरोजगारासाठी मोठी मदत मिळणार असून दिव्यांग व्यक्तींसाठी पालिका निवडणुकीपूर्वी मिळालेली आनंदाची व दिलासा देणारी बाब आहे.

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना दिव्यांग व्यक्तींसाठी लागू असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र, राज्य शासनाकडून आणि मुंबई महापालिकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन (eradication of poverty) योजनेच्या अंतर्गत विविध योजनांचा, उपक्रमांचा लाभ देण्यासाठी नियमाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी (Local Body) अर्थसंकल्पातील किमान ५% निधी राखीव ठेवने बंधनकारक आहे.

मुंबई महापालिकेने मुंबईतील रहिवाशी असलेल्या दिव्यांग व्यक्तींना (१८ ते६० वयोगट) स्वयंरोजगारासाठी ‘ इलेक्ट्रिक सायकल’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी मुंबई महापालिकेकडून ९५% अनुदान देण्यात येणार असून उर्वरित ५% रक्कम लाभार्थ्यांची उभी करणे गरजेचे आहे. मात्र गेल्या २ वर्षांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्याचा मोठा फटका दिव्यांग व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.

त्यामुळेच पालिकेने लाभार्थी दिव्यांग व्यक्तींना ५% रक्कम जमा करण्याची अट बाजूला ठेवत १००% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

इलेक्ट्रिक सायकलचा वापर करून दिव्यांग व्यक्तींना कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, समोसा, वडापाव, भजी, बिस्कीट, मासे आदी पदार्थांची विक्री करून आपला स्वयंरोजगार उभारून आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करू शकणार आहेत.

पालिकेने महिला, दिव्यांग यांसाठी अर्थसंकल्पात ३ कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबईतील २२७ वार्डात पात्र प्रत्येकी २ दिव्यांग व्यक्तींना म्हणजेच ४५४ दिव्यांग व्यक्तीना प्रत्येकी ३९ हजार ९०० रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल देण्यात येणार असून त्यासाठी पालिकेला एकूण १ कोटी ८१ लाख १४ हजार ६०० रुपये खर्च येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here