मुंबई महानगरपालिकेत संशोधनाचा नवा प्रयोग
@maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोरोना उपप्रकार (corona variants) आणि त्यातील बारकावे तपासण्यासाठी आतापर्यंत विविध गटाचे १० जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) चाचण्या केल्या. आता कोरोना आणि त्याचे उपप्रकार संशोधनासाठी अधिक सूक्ष्म पातळीवर संशोधन प्रयोग सुरु करणार आहे. यात मुंबईतील विविध ठिकाणावरील मेन होल (manhole) तसेच पम्पिंग स्टेशनमधील (pumping station) सांडपाण्याचे नमुने (sample of sewage) घेणार आहेत.
या नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) करून पॉझिटीव्ह नमुन्यांची जीनोम सिक्वीसिंग करणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले. कोरोना उपप्रकार समजण्यासाठी सांडपाण्याचे नमुने तपासण्याचा प्रयोग करणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका ठरणार आहे.
सांडपाणी नमुने तपासणी प्रयोगावर बोलताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संगितले की, त्यासाठी मुंबईतील २४ वॉर्डातील मेनहोलमधून सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. या नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. यात पॉझिटिव्ह आढळलेले नमुने जिनॉम सिक्वेसिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील असे काकाणी म्हणाले.
या अहवालाने उपचारातील संसर्ग आजारातील ध्येय धोरणे तसेच उपचारातील प्रोटोकॉल समजण्यास मदत होणार आहेत. शिवाय असा प्रयोग पहिल्यांदाच होणार असून या सर्व्हेतून आतापर्यंत माहित नसलेले इतरही मुद्दे समजण्यास मदत होणार आहे. सध्या कोणत्या उपप्रकारातील रुग्ण आढळून येत आहेत, तो उपप्रकार समजणार आहे.
त्याच बरोबर विषाणूतील बदल, क्रिया आणि उपक्रियांचा प्रभाव अशी इत्थंभूत माहिती संशोधकांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोविड-१९ ची (covid-19) लक्षणे दिसण्यासाठी तीनपासून चौदा दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, सांडपाण्यातून विषाणूचे वास्तव्य लवकर आढळून येते. शिवाय नवा उपपकार समजल्यास सावध राहून उपचार पद्धतीत आवश्यक बदल करण्यास सोपे जाऊ शकते असेही काकाणी म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेने कोविडच्या तीन लाटांवर यशस्वी उपाय उपचार केले. मुंबई महानगर पालिका मनुष्यबळ, संसाधने आणि प्रयोगशाळा अशा आवश्यक संसाधनांनी स्वयंपूर्ण असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे संशोधनातून धोरणे आणि उपचार प्रोटोकॉल ठरण्यास मदत होणार असल्याचेही सुरेश काकाणी म्हणाले.