@maharashtracity

मुंबई: मुंबईत पावसाळ्यात धोकादायक, अति धोकादायक इमारती (dilapidated buildings) कोसळण्याच्या व त्यामध्ये होणारी जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने या अति धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची समजूत काढून त्यांची पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच सप्टेंबरअखेरपर्यंत पर्यायी ठिकाणी तात्पुरता राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसाळ्यात होणाऱ्या धोकादायक इमारतींच्या दुर्घटना व जीवित हानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश पालिका आयुक्त व प्रशासनाला दिले होते. त्यानुसार,

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, आज पालिका मुख्यालयात पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापनबाबत संबंधित खाते व प्रमुख अधिकारी यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरीलप्रमाणे आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले.

मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांनी इमारत रिकामी करावी, यासाठी महापालिकेद्वारे सातत्याने विनंती व आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित नियमांनुसार आवश्यकती कार्यवाही व कारवाई देखील नियमितपणे करण्यात येत आहे, असा दावा पालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

एकंदरीत आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि नागरी सेवा- सुविधांबाबत अधिकाधिक परिपूर्ण व अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्राचे संबंधित खासदार व आमदार यांच्याशी नियमितपणे संपर्क साधण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.

खड्डे ४८ तासात बुजविण्याचे आदेश

मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे (potholes) पडण्याची दाट शक्यता असते. या खड्ड्यांबाबत विविध माध्यमातून व हेल्पलाईनच्याही माध्यमातून माहिती व तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत असतात.

या तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असू नये, यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी संबधित खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, पावसाळ्यादरम्यान खड्डे भरताना प्राधान्याने ‘कोल्डमिक्स’ (coldmix) साहित्य वापर करण्यात येत आहे.

महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची नियमितपणे पाहणी करण्याचे व पाहणी दरम्यान आढळून आलेल्या खड्ड्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here