@maharashtracity
मुंबई: दलित इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (DICCI) ने केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर बँक ऑफ बडेदाने त्यांच्या विशेष कर्ज योजनेला मुदतवाढ दिली आहे.
बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda – BOB)पहिल्या पिढीतील उद्योजकांकरिता सुरू केलेल्या ‘बडोदा टँकरेज’ (Baroda Tankerz) या विशेष कर्ज योजनेला मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेची मुदत त्यांनी पाच वर्षांवरून आठ वर्षांपर्यंत वाढविली आहे.
त्यामुळे या योजनेचे लाभार्थी असलेल्या प्रामुख्याने दलित समाजातील सुमारे तीन हजार उद्योजकांना लाभ होणार असून कर्जाचा हफ्ता सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी कमी होणार आहेत, अशी माहिती डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे (Milind Kamble) यांनी दिली.
कोरोना साथीच्या काळात झालेल्या नुकसानीमुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली होती. राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे (RS MP Dr Vinay Sahastrabuddhe) यांच्या माध्यमातून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर डिक्कीच्या शिष्टमंडळाने अलिकडेच हा विषय मांडला होता.
श्री. कांबळे यांच्यासह संजीव डांगे, पंकज साळवे, संतोष कांबळे आणि अरूण धनेश्वर यांचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाने केलेल्या पाठपुराव्यानुसार या योजनेेची मुदत वाढविण्यात आली आहे, असे कांबळे यांनी म्हटले आहे.