@maharashtracity

कडक कारवाईची काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे मुंबईच्या पर्यावरणासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे सायन कोळीवाडा येथील एका बिल्डरला पालिका वृक्ष प्राधिकरणाने विकास कामांसाठी फक्त २२ झाडे कापण्यास परवानगी दिली असताना त्याने तेथील सर्वच म्हणजे ६९ झाडांची कत्तल केली आहे, असा आरोप पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला आहे.

पालिका वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष पालिका आयुक्त इकबाल चहल (IS Chahal) हे असून त्यांनी व समितीने मिळून त्या बिल्डरला २२ झाडे कापण्यास परवानगी दिली होती. मात्र, बिल्डरने (Builder) प्रत्यक्षात किती झाडे कापली, जगवली अथवा पुनररोपित केली, याची जबाबदारी कोणी घ्यायला मागत नाही, असा तक्रारीचा सूर लावत रवी राजा यांनी, या वृक्ष कत्तलीला अप्रत्यक्षपणे आयुक्त, वृक्ष प्राधिकरण समिती यांना जबाबदार ठरवत त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले आहे.

याप्रकरणी दोषी बिल्डरवर पालिकेने कडक व कठोर अशी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

सायन कोळीवाडा परिसरातील सरदार नगर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या तीन इमारती धोकादायक ठरल्यामुळे त्यांचा बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात येणार आहे. मात्र या जागेवरील काही झाडे बांधकामाच्या आड येत असल्याने बिल्डरने तेथील ६९ झाडांपैकी २२ झाडे कापण्यासाठी, ३६ झाडे आहे तशी जागेवरच ठेवण्यासाठी आणि उर्वरित ११ पुनर्रोपित करण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली होती.

त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीने त्या बिल्डरला २२ झाडे कापण्यास व उर्वरित ११ झाडे पुनर्रोपित करण्यासाठी आणि ३६ झाडे आहे त्या स्थितीत जागेवरच ठेवण्याबाबत पालिकेकडे अर्ज करून परवानगी मागितली होती. त्या बिल्डरला पालिका वृक्ष प्राधिकरण समितीने ३ -४ महिन्यांपूर्वीच परवानगी दिली होती. मात्र बिल्डरने कामगारांना सांगून त्या सर्व ६९ झाडांची भर दिवसा कत्तल केली, असा आरोप रवी राजा यांनी यावेळी केला.

बिल्डर, अधिकारी यांचे संगनमत

या सर्व झाडांच्या कत्तलीला संबंधित पालिका अधिकारी व बिल्डर यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला आहे. या प्रकरणी आपण स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषी बिल्डर व संबंधीत पालिका अधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रवी राजा यांनी केली आहे.

काँग्रेस नगरसेविका येणार अडचणीत ; पक्षाकडून नोटीस

या प्रकरणी विरोध दर्शवण्याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीवरील कॉंग्रेस सदस्य नगरसेविका सुषमा राय (Congress Corporator Sushma Rai) यांना लिखित पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र त्यांनी या प्रस्तावाला विरोध न करता त्या संबंधित विझिट अहवालावर स्वाक्षरी केली, असे रवी राजा यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडे याप्रकरणी खुलासा मागण्यात आला आहे, असे रवी राजा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here