@maharashtracity
२२,७७४ शौचकुपांचे काम हाती घेतले
२०१८ पासून मे २०२२ पर्यंत १९,५५६ शौचकुपांचे काम पूर्ण करणे शक्य
३,२१८ शौचकुपांची कामे रखडणार
शौचालय दुरुस्तीसाठी ४४.४८ कोटी रुपयांची तरतूद; खर्च २७ कोटी रुपये
मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीच्या आदेशाने पालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागामार्फत २०१८ – १९ या वर्षात २२ हजार ७७४ शौचकुपे बांधण्याची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी असतानाही ही कामे नियोजनपूर्वक न झाल्याने मे २०२२ पर्यंत १९ हजार शौचकुपांची कामे पूर्ण करणे शक्य होणार आहेत. तर उर्वरित ३ हजार २१८ शौचकुपांची कामे रखडणार आहेत.
त्याचप्रमाणे पालिकेने ‘ए’ ते ‘टि’ या २४ प्रभागातील २२७ वार्डात शौचालये दुरुस्तीच्या कामांसाठी सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षात एकूण ४४ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्यापैकी आतापर्यंत २७ कोटी १ लाख रुपये खर्चून ३२४ शौचालयांची (lavatories) दुरुस्ती केली आहे. त्यामुळे अद्यापही १७ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे.
यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पालिकेच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने वरीलप्रमाणे माहिती दिली आहे.
त्यामुळे एकीकडे पालिकेकडे विविध बँकांत ८७ हजार कोटींच्या मुदतठेवी असताना व पालिकेचा अर्थसंकल्प ३९ हजार कोटींवरून थेट ४६ हजार कोटीपर्यंत उड्डाणे घेत असताना वाढत्या लोकसंख्येनुसार मुंबई शहर व उपनगरे येथे सार्वजनिक शौचालये व मुतारी यांची संख्या अपुरी पडत आहे.
अनेक शौचालये मोडकळीस आले आहेत. तर काही शौचालये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात आले असून त्या ठिकाणी नवीन शौचालये अद्यापही उभारण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे पालिकेकडे कोट्यवधी रुपयांचा निधी असूनही नागरिकांना नवीन शौचालये व मुतारी यांची यांची कमतरता भासत आहे. दुसरीकडे नियोजनाअभावी शौचालयांची दुरुस्ती वेळेत होताना दिसत नाही. पालिका प्रशासन सदर कामांबाबत उदासीन असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.