@maharashtracity

धुळे: पेट्रोल, डिझेल दरवाढीसह वाढत्या महागाई विरोधात बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बैलगाडीवर दुचाकी, गॅस सिलींडर ठेवून मोर्चा काढण्यात आला. (NCP youth congress held protest against petrol diesel hike)

शहरातील शिवाजी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा शहर पोलिसांनी राजकमल चित्रमंदिराजवळ अडवला. त्यामुळे मोर्चेकर्‍यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत निदर्शने केली. तसेच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत सिसोदे, प्रदेश सचिव सुमित पवार, जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, दानिश पिंजारी, सचिन देवरे, आनंद पाटील, विहिन पाटील, राजेंद्र चौधरी, निलेश चौधरी, रोहित सुडके, मयुर देवरे, मोहन शिंदे, कार्तिक मराठे, कल्पेश मगर, निखिल सुमय्या, ज्ञानेश्‍वर माळी, यशंवत डोमोर, महेंद्र शिरसाठ आदीसह महिला पदाधिकारी सहभागी झाले होते.

या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकार गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज दरवाढ करुन सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटत आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यातील निवडणूका समोर ठेऊन केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलची दरवाढ काही प्रमाणात कमी केली होती. त्यामुळे थोडासा का होईना नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा सततच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

त्यात भारतीयांचा दिवाळी हा मोठा सण जवळ आला आहे. या महागाईच्या काळात सण कसा साजरा करावा, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. कुंभकर्णाप्रमाणे झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here