@maharashtracity

मुंबई: मुंबईत मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुण्या, हत्तीरोग इत्यादी आजारांच्या नियंत्रणासाठी आवश्यक अळीनाशक तेलाच्या दरात वाढ झाल्याने पालिकेला पुढील ३ वर्षांसाठी आवश्यक तेल खरेदीपोटी तब्बल ३ कोटी ११ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. त्यावेळी पालिकेतील पहारेकरी भाजप (BJP) व विरोधी पक्ष पालिकेला या दरवाढीचा जाब विचारणार, प्रस्ताव रोखणार की प्रस्तावाला सहमती देणार हे समोर येणार आहे.

शहर व उपनगरात विशेषतः झोपडपट्टी परिसरात मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), चिकूनगुण्या (Chikungunya), हत्तीरोग (Lymphatic Filariasis) इत्यादी आजारांच्या निर्मूलनासाठी पालिका कीटकनाशक विभाग आवश्यक अळीनाशक तेलाची (oil pesticide) खरेदी नियमित करते. या कीटकनाशक विभागाला डास निर्मूलनासाठी दरवर्षी ११ लाख लिटर अळीनाशक तेलाची खरेदी करावी लागते.

कीटकनाशक विभाग दर ३ वर्षांसाठी या अळीनाशक तेलाचा साठा भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation – IOC) कंपनीकडून खरेदी करते.

सन २०१९ – २२ या ३ वर्षांसाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीकडून प्रति लिटर ८२.६० रुपये या दराने वर्षभरासाठी ११ लाख लिटर याप्रमाणे ३३ लाख लिटर अळीनाशक तेलाचा साठा खरेदी केला होता.

त्यासाठी पालिकेला २७ कोटी २५ लाख रुपये खर्च आला. आता या कंत्राटकामाची मुदत ३१ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे.

त्यामुळे पालिका कीटकनाशक विभागाने अळीनाशक तेलाचा साठा संपुष्टात येण्यापूर्वीच नवीन साठा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यामुळे आता २०२२ ते २०२५ या ३ वर्षांसाठी आवश्यक अळीनाशक तेलाचा साठा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३ वर्षांसाठी कीटकनाशक विभाग मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीकडून प्रति लिटर ९२.०४ रुपये या दराने वर्षभरासाठी ११ लाख लिटर याप्रमाणे ३३ लाख लिटर अळीनाशक तेलाचा साठा खरेदी करणार आहे. त्यासाठी पालिकेला ३० कोटी ३७ लाख रुपये खर्च येणार आहे.

मात्र मागील खरेदी दर प्रति लिटर ८२.६० रुपये व एकूण खर्च २७ कोटी २५ लाख रुपये होता. तर आगामी ३ वर्षासाठीचा दर प्रति लिटर ९२.०४ रुपये व एकूण किंमत ३० कोटी ३७ लाख रुपये एवढी आहे.

त्यामुळे दरांची व एकूण खर्च रकमेची तुलना केल्यास मागील दरापेक्षा यावेळीचे दर प्रति लिटर ९.४४ रुपये एवढा जास्त असल्याने पालिका कीटकनाशक विभागाला मागील खरेदीच्या एकूण किमतीपेक्षा ३ कोटी ११ लाख रुपये जास्त खर्च येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here