@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने कोविडवरील औषध व लस उपलब्ध नसतानाही ज्याप्रकारे धारावीसारख्या (Dharavi) झोपडपट्टीसह संपूर्ण मुंबईत कोविडवर आदर्शवत ‘मुंबई मॉडेल’ (Mumbai Model) द्वारे नियंत्रण मिळविले, त्याची माहिती जाणून घेतल्यावर अखिल भारतीय प्रशासन सेवेतील (Indian Administrative Service) अधिकारी चांगलेच भारावले.
कोविड संसर्गाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेला (corona wave) नियंत्रणात आणण्यात सिंहाचा वाटा असणारे व पालिका आरोग्य खात्यासह कोविडची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे, यशस्वीपणे पार पडणारे पालिकेचे ‘कोविड योद्धा’ अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी अखिल भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत असलेले अधिकाऱ्यांच्या समुहाला कोविड उपाययोजनांबाबतची संपूर्ण माहिती दिली.
अखिल भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या समुहाने सेवांतर्गत नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून ‘धारावी’ झोपडपट्टीला सोमवारी भेट दिली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी त्यांना धारावीसह संपूर्ण मुंबईत महापालिका प्रशासनाने कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या अथक आणि वैविध्यपूर्ण कामांची माहिती दिली.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (Tata Institute of Social Science -TISS) वतीने अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना सेवांतर्गत प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रशिक्षण दिले जाते. मनुष्यबळ आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या विनंतीनुसार मागील ११ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यंदादेखील संस्थेच्या वतीने २१ ते २५ मार्च २०२२ या कालावधीत सामाजिक धोरणे आणि शासन या विषयावर आणि कोविड – १९ परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, वन सेवेतील अधिकारी असे मिळून सुमारे ३० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, प्राधिकरणांचे संचालक, सचिव अशा महत्त्वाच्या हुद्यांवर सेवा बजावत असलेल्या या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सोमवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सामाजिक धोरण व शासन : कोविड – १९ ची सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिले.
कोविडची साथ, त्याचे समाजव्यवस्थेत आणि अर्थव्यवस्थेत उमटलेले विपरित परिणाम, यातून सावरण्यासाठी शासकीय धोरणांचे व कामकाजाचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले. मुंबई महानगरात राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या उत्तम समन्वयातून झालेल्या कामकाजामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने योग्य प्रतिसाद दिला. त्यातूनच मुंबई महानगर फक्त सावरलेच नाही तर, नवीन जीवनशैली स्वीकारून पुढच्या दिशेने निघाले आहे, असे काकाणी यांनी नमूद केले.
कोविड विषाणू संसर्ग स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने केलेल्या कामकाजाची, मुंबई मॉडेलची सविस्तर माहिती देऊन आता हे मॉडेल मुंबईतील विभाग पातळीवर राबविण्यात येईल आणि त्यातून नागरी सेवा-सुविधांचा दर्जा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी, जी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांनी, धारावीत कोविड नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.