@maharashtracity

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेवतकरांची मागणी

धुळे: राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे सदस्य निरीक्षणासाठी नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Nandurbar Goverment medical college) येणार असल्याने धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 30 अध्यापकांची (डॉक्टरांची) तेथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आत्मनिर्भर भारत अभियानाचे जिल्हा संयोजक सचिन शेवतकर यांनी केली. (BJP demands to revoke deputation of govt doctors to Nandurbar)

याबाबत सचिन शेवतकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Medical Education minister Amit Deshmukh) यांना निवदेन दिले. त्यात म्हटले आहे, की धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरणारे 545 खाटांच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धुळे जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच दररोज हजारो रुग्णांवर येथे उपचार होतो.

अनेक रुग्णांवर किचकट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही होतात. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीवेळी या वैद्यकीय महाविद्यालयाने तथा सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता, अध्यापक तसेच सर्व कर्मचार्‍यांनी सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडून रुग्णांना जीवदान दिले आहे. कर्मचारी संख्या कमी असूनही करोना काळात याच रुग्णालयाने हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत.

शिवाय, या वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग तीन-चारच्या कर्मचार्‍यांची मोठी पदे रिक्त असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे विविध आरोग्य सेवांमध्ये व्यत्यय येत आहे. याबाबत अनेकदा व्यथा मांडूनही काहीच कार्यवाही झाली नाही.

मात्र, नंदुरबार येथे 100 विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2020-21 पासून सुरू झाले असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे सदस्य निरीक्षणासाठी नंदुरबार येथे येत आहेत. तेथे पुर्ण क्षमतेने कायमस्वरुपी कर्मचारी नियुक्ती न करता आता धुळे येथील 30 डॉक्टरांची नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिनियुक्तीने बदली करण्यात येत आहे.

यामुळे सरकारकडून धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचे कट-कारस्थान होत असल्याचे दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार येथे ज्या अध्यापकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी सचिन शेवतकर यांनी केली आहे.

तसेच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार डॉ. सुभाष भामरे, तसेच जिल्हाधिकार्‍यांनाही देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here