@vivekbhavsar
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक २७ मे रोजी बदल्यांना स्थगिती देणारा काढलेला आदेश म्हणजे लोकनियुक्त सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणे आहे. यावर कडी म्हणजे एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची बदली करण्याचा आदेशावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी स्वाक्षरी केली आहे. तरीही या अधिकाऱ्याने पद सोडलेले नाही. मुख्यमंत्र्यांनाही न मोजणाऱ्या या अधिकाऱ्याला एखाद्या खमक्या मुख्यमंत्र्यांनी घरचा रस्ता दाखवला असता. पण प्रशासनावर अजिबात पकड नसल्यानेच कोणीही उध्दव ठाकरे यांना गांभीर्याने घेत नसल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसते. त्यामुळे ठाकरे यांनी सरळ राजीनामा देवून पक्ष सांभाळावा आणि सेनेचाच मुख्यमंत्री हवा हाच आग्रह कायम असेल तर खुशाल आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे.
कोरोनामुळे सन २०२० आणि २०२१ मध्ये विशेष परिस्थिती होती. त्यामुळे बदलीसाठी स्थगिती देण्याचे आदेश वारंवार काढले जात होते. यंदा कोवीड ची विशेष परस्थिती नसल्याने बदल्यांची अडचण नव्हती.
राज्य मंत्रिमंडळाच्या काल गुरूवारी झालेल्या बैठकीत बदलीच्या विषयावर चर्चा झाली. बदलीबाबत गेल्या वर्षी काढला तसा आदेश अजून निघाला नसल्याने बदल्या केल्या जात नसल्याचा खुलासा अधिकाऱ्यांकडून करण्यात करण्यात आला.
मात्र, आता कोरोना नसल्याने बदली करण्यास हरकत नसावी, असे मंत्र्यांकडून मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. विशेष आदेश काढण्याची गरज नाही. बदली संदर्भात २०१५ च्या शासन आदेशाचे पालन केले जावे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. ३१ मे अखेरपर्यंत बदल्या केल्या जाव्यात असे या आदेशाचा अर्थ आहे.
तेव्हा मंत्र्यांनी सांगितले की आता कालावधी कमी आहे, यादी केव्हा तयार करणार? बदली सदर्भातील बोर्ड केव्हा तयार करणार आणि आदेश केव्हा काढणार? असा मंत्र्यांचा तक्रारीचा सूर होता. मंत्र्यांनी बदल्यांसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आणि ३० जून अखेपर्यंत बदल्या करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत सहमती झाली.
प्रशासन आणि लोप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसेल किंवा लोकप्रतिनिधी खमके नसले की प्रशासन मनमानी करते. बदलीबाबत यापैकी एक कारण असावे. बदलीला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला असतांना बदल्यांना स्थगिती देण्याचा आदेश काढण्यात आला.
वर नमूद केल्याप्रमाणे एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची बदली करावी असे अनेक मंत्र्यांची मागणी होती. त्या प्रमाणे बदलीचे आदेश काढले गेले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदेशावर सही केली, तरीही सबंधित अधिकारी या आदेशावर अमलबजावणीसाठी करायला तयार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला डावलण्याची हिम्मत अधिकारी दाखवत असतील, तर अशा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देवून घरी बसावे. दुर्दैवाने मुख्यमंत्री ठाकरे मराठी विरोधक सनदी अधिकाऱ्यांच्या इतक्या प्रेमात आहे की त्यांना स्वतःच्या दिव्याखाली किती अंधार आहे हेच दिसेनासे झाले आहे. प्रशासनावर पकड असलेले अनेक मुख्यमंत्री या राज्याने बघितले. पण केवळ कुटुंब प्रमुखासारखे बोलून आणि जमेल तेव्हा मंत्रालयात काही वेळेसाठी येणारे मुख्यमंत्री पहिलेच असतील.
- विवेक भावसार
संपादक,
Maharashtracity
Cell : 9930403073