@maharashtracity

महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला मुख्यमंत्र्यांची भेट
पालिकेच्या नालेसफाई कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
रेल्वे बंद पडल्यास एसटी, बेस्ट बसगाडया व नाश्त्याची सुविधा
धोकादायक इमारतीमधील लोकांची पर्यायी व्यवस्था
खड्ड्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी दर्जेदार रस्ते बनविण्याचे आदेश

मुंबई: मुंबईला आमच्या सरकारच्या कार्यकाळातच पुरमुक्त (flood free Mumbai) करणार आहोत. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मुंबईकरांना दिली आहे.

मुंबईत सध्या जोरदार पाऊस (heavy rain) पडत आहे. मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्हयात ‘रेड व ऑरेंज अलर्ट’ (red and orange alert) जारी केला आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिकेने (BMC) पावसाळ्याला तोंड देण्यासाठी चांगली तयारी केली आहे. नालेसफाईची (Nullah Safai) कामे चांगली केल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचत नाही. या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे.

तसेच, धोकादायक इमारतीमधील (dilapidated building) नागरिकांनी त्वरित जागा खाली करावी व पालिकेने त्यांची पर्यायी व्यवस्था करावी. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन रेल्वे सेवा ठप्प झाल्यास रेल्वे प्रवासात अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी बेस्ट, एसटी बस सेवा आणि नाश्त्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला (Disaster Management Cell) मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भेट देवून मुंबईतील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी, पालिका आयुक्त इकबाल चहल व आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्री यांना तयारीची माहिती दिली.

पालक सचिव, जिल्हाधिकारी यांना आदेश

मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्हयात ‘रेड व ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. आज सकाळपासून जोरदार पावसाचा अंदाज आल्याने जिल्हाधिकारी यांच्या बैठका घेऊन त्यांना नद्यांमुळे पुरस्थिती उद्धभवल्यास आवश्यक यंत्रणा, मदतकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पालक सचिव यांना अधिकार असल्याने त्यांना मदतीसाठी जबाबदारी देण्यात आली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफ (NDRF), नौदल (Navy) यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. आतापर्यंत ३,५०० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

दरड कोसळण्याच्या ठिकाणी, धोकादायक इमारतीमधील लोकांना स्थलांतरीत करावे

धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना तात्काळ घरे खाली करायला सांगून त्यांची संक्रमण शिबिरात पर्यायी व्यवस्था करावी. कारण की, मालमत्तेपेक्षाही जीवाचे मोल जास्त असते. तसेच, दरड कोसळण्याच्या ठिकाणी नागरिकांना वाचविण्यासाठी तेथील घरे खाली करून त्यांना तात्काळ आवश्यक पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नालेसफाई चांगली झाल्याने पाणी साचत नाही

मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वी चांगली नालेसफाई कामे केल्यामुळे हिंदमाता सारख्या ठिकाणी पाणी साचत नाही. तसेच, पालिकेने पंपिंग व्यवस्था केल्याने साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्यास मदत होत असल्यामुळे २०० ठिकाणी पाणी साचणे कमी झाले आहे, अशी माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेची पाठ थोपटत कौतुक केले.

रेल्वे सेवा ठप्प झाल्यास प्रवाशांसाठी एसटी, बेस्ट बस व नाश्त्याची सुविधा

दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास रेल्वे मार्गावर २५ ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होऊन प्रवासी, महिला रेल्वेत तासनतास अडकून बसतात. त्यांच्याजवळ प्रवासात पैसे नसल्यास घरी जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षा यांना जास्त भाडे भरून घर गाठणे अवघड होते. त्यामुळे त्या रेल्वे प्रवाशांना त्रासापासून दिलासा देण्यासाठी व त्यांना लवकरात लवकर घरी जाण्यासाठी बेस्ट, एसटी बस सेवा आणि नाश्त्याची व्यवस्था करावी. दूर अंतरावर राहणाऱ्या लोकांसाठी पालिका शाळेत राहण्याची व्यवस्था करावी. तसेच, पालिकेने त्यासाठी वार्ड अधिकारी नेमावेत, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

खड्डे समस्या मार्गी लावण्यासाठी दर्जेदार रस्ते

मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, खड्डे पडू नयेत यासाठी दर्जेदार रस्ते बनविण्याचे व रस्ते कामांचा हमी कालावधी वाढविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला यावेळी दिले. तसेच, खड्डे बुजविण्यासाठी दर्जेदार कोल्डमिक्स मटेरियल वापरण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here