@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोरोनाला न जुमानता देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’चे (coastal road project) काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामाच्या अंतर्गत झालेल्या काही बदलांमुळे कंत्राटकामाच्या एकूण खर्चात अंदाजे ६.८४ कोटी रुपये अधिक तीन महिने कालावधीची बचत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाअंतर्गत नेमण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने (Project Management Consultant – PMC) त्याचा मेहनताना म्हणून ७.२९ कोटींची मागणी केली आहे ; मात्र ह्या वाढीव शुल्काचा आर्थिक फटका पालिकेला बसणार नसून कंत्राटदार (contractor) स्वतः त्या सल्लागाराला ही रक्कम अदा करणार आहे.

या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

‘कोस्टल रोड’च्या प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यन्तचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (L & T) कंपनीला तर वांद्रे ते वरळी भागाचे काम मेसर्स एच.सी.सी. – एच. डी. सी. (HCC -HDC) या कंत्राटदारांना संयुक्त भागीदारीत कंत्राटकाम देण्यात आले. कोस्टल रोडच्या एकूण कामाला तब्बल १२ हजार कोटी ७२१ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

या कामासाठी प्रकल्प सल्लागाराबरोबरच मे. एईकॉम एशिया कंपनी याची साधारण सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र काम सुरू असताना साधारण सल्लागार व आयआयटी पवई (IIT Powai) यांच्या तज्ज्ञांनी कोस्टल रोड प्रकल्पात पुलाच्या कामासाठी व आंतरबदलासाठी अनेक स्तंभ पायाऐवजी एकल स्तंभ पाया या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केली. त्यामुळे कंत्राट खर्चात एकूण ११ कोटी ९४ लाख रुपयांची बचत होणार आहे.

मात्र या कंत्राट कामातील बदलामुळे प्रकल्प सल्लागाराने आपल्या ५ कोटी ९१ लाख रुपयांची शुल्कवाढ मागितली होती. त्यास ऑगस्ट २०२१ रोजी मान्यता देण्यात आली होती.

Also Read: मुंबईसाठी आगामी १५ दिवस परिक्षेचे

आता पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रस्ताव स्थायी समितीला मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. इजिस इंडिया कन्सल्टिंग इंजिनिअर्स (Egis India Consulting Engineers), मे. कलीन ग्रुमिट आणि रो (युके) लिमिटेड या कंत्राटदरानेही ७ कोटी २९ लाख रुपयांचे वाढीव शुल्क मागितले आहे.

परिणामी सदर सल्लागाराला यापूर्वी ठरल्याप्रमाणे देय असलेल्या ५७ कोटी ६१ लाख रुपयांच्या शुल्कात आणखीन ७ कोटी २९ लाख रुपयांची वाढ होऊन सदर रक्कम ६४ कोटी ९१ लाख रुपयांवर जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here