@maharashtracity

पहिल्या पंधरवड्यातच कोरोनाबाधित मुलांची संख्या किंचित वाढली

मुलांमधील संसर्गावर पालिकेचे बारिक लक्ष

मुंबई: पहिल्या कोरोना लाटेदरम्यान तसेच दुसरी लाट तेजीत असताना आणि आता दुसरी लाट कमी होत असताना कोरोनाच्या अशा तीन टप्प्यावर मुलांमधील बाधित होण्याचे प्रमाण किंचित वाढले असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. (Bad news for children below 19 years old)

शाळा सुरु होत असताना मुलांमधील ही रुग्णवाढ पालक आणि पालिकेला सावध पावित्रा घेण्यास भाग पाडत आहे.

दरम्यान, ऑक्टॉबर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत १९ वर्षाखालील कोविड रुग्णांमध्ये (covid patients) वाढ झाली. या वयोगटात ७.३ टक्के एवढे रूग्ण होते. त्यात गेल्या पंधरा दिवसात ७.८ टक्के एवढी वाढ झाली. १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ९ वर्षाखालील २०२ मुलांना तर १० ते १९ वयोटातील ५७८ मुलांना कोविड संसर्ग झाला.

सप्टेंबर महिन्यात याच वयोगटातील अनुक्रमे ४२५ आणि १०४८ मुले बाधित झाली होती. याचा अर्थ १० ते १९ वयोगटातील मुलांमध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पालिकेने काळजी घेत पुढील निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला आहे.

आगामी काळात बाधित मुलांची संख्या वाढेल की कमी होईल यावरून पालकांमध्ये गोंधळ आहे. नेमक्या याच दरम्यान शाळा सुरु झाल्याने मुलांमधील संसर्गवाढीवरुन चिंता ही व्यक्त करण्यात येत आहे. ही वाढ किंचित असल्याने काळजी नसावी असे ही आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

आता रुग्ण संख्या कमी होत असल्याने आणि लसीकरणाची वाढते प्रमाण पाहता सरकारने ४ ऑक्टोबरपासून आठवी – नववीचे वर्ग खुले करण्याचा निर्णय घेतला. मात्र मागच्या आठवड्यात हे वर्ग सुरु करण्यात आले.

पहिल्या लाटेत मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत १९ वयाखालील १८ हजार ९४ मुले बाधित झाली होती. याची सरासरी ५.७ टक्के एवढी होती. दुसऱ्या लाटेतही ही वाढ दिसून आली. जून पर्यंत १३ टक्के वाढ झाली असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. तर त्या नंतर आणखी १० टक्क्यांची भर पडत आहे.

दरम्यान, सध्या रुग्णवाढ होत नसली तरी कोविड संपलेला नसल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले. पालिका लहान मुलांच्या बाधित होण्याच्या संख्येचे निरीक्षण करत आहेत. यात निष्काळजीपणा केल्यास चित्र बदलू शकते असेही काकाणी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here