ना.नितीन गडकरींना काँग्रेस प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांचा सवाल

संघ मुख्यालयात दडलेल्या सौमित्रास अटक करा

@maharashtracity

अमरावती

पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केला म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत असते परंतु आता नागपूरकर ना.नितीन गडकरी यांनी अमरावती विभागावर अन्याय करत अमरावती येथे कार्यरत असलेले विकास प्रकल्प पळविण्याचा बेत आखला आहे. आता या अन्यायाविरुद्ध स्वतंत्र वर्‍हाड राज्याची मागणी करावी का ? असा सवाल काँग्रेस प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी विचारला आहे.
अमरावती येथे गत अकरा वर्षापासून सुरू असलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) केंद्र म्हणजेच भारतीय जनसंचार संस्था नागपूर येथे स्थलांतरित करण्यासाठी ना.नितीन गडकरी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. नामदार नितीन गडकरी यांची ही संस्था पळवापळवी निषेधार्ह असून विदर्भातील विभागीय असमतोलास खतपाणी घालणारी व फुटीची बीज रोवणारी आहे, असे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
अमरावती विद्यापीठाच्या परिसरात २०११ पासून सुरू असलेले आयआयएमसीचे केंद्र अत्यंत सुचारु पद्धतीने सुरू होते. संघाचे कट्टर समर्थक डॉ.अनिल सौमित्र यांना जेव्हापासून इथे पाठवण्यात आले, तेव्हापासूनच त्यांनी मागासवर्गीय व बहुजन कर्मचार्‍यांचा छळ आरंभल्याचा आरोप आहे. त्याचे पर्यावसान त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्यात झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय अजेंडा राबविणार्‍या सौमित्र यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर मागासवर्गीय प्राध्यापक विनय सोनुले आणि बहुजन प्राध्यापक अनिल जाधव यांना निलंबित करून पळ काढला आहे. फरार डॉ. अनिल सौमित्र यांना विनाविलंब अटक करण्यात यावी व प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी केली आहे.


राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आहेत म्हणूनच ज्यांची नियुक्ती अमरावती आयआयएमसी अमरावती येथे करण्यात आली, त्या डॉक्टर अनिल सौमित्र यांच्या बहकाव्या वरूनच नितीन गडकरी यांनी पत्रकारांसाठी सुरू असलेले अमरावतीचे हे ज्ञान केंद्र नागपूर येथे हलविण्याची शिफारस माहिती व प्रसार मंत्र्यांना केली आहे. डॉ.अनिल सौमित्रांसह नितीन गडकरी यांनाही संघाच्या मुख्यालयी नागपूर येथे हे केंद्र हवे आहे. त्याचप्रमाणे संघाच्या इच्छेला मान देऊन अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू संघाचेच कोकरु डॉ.दिलीप मालखेडे यांनीही आय आय एम सीचे केंद्र आमच्या परिसरातून खाली करा, असा फतवा काढला आहे.

या सर्वांची मिलीभगत असून अमरावतीचे केंद्र नागपूरला स्थानांतरित करण्याचा हा एकमुखी कुटील डाव आहे. अमरावती केंद्र इंग्रजी व मराठी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी १७ विद्यार्थ्यांसाठी असताना मराठी अभ्यासक्रमासाठी१६ आणि इंग्रजीसाठी १३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेतल्याचे नमूद करून या केंद्राचा विस्तार व विकास होणार नाही, म्हणून ते बंद करण्यात यावे व नागपूरला स्थलांतरित करण्यात यावे असे पत्र नितीन गडकरी यांनी माहिती व प्रसार मंत्र्यांना पाठवलेले आहे. मराठी अभ्यासक्रमासाठी जेवढ्या जागा होत्या त्या पैकी १ जागा रित्त असुन अनुसुचीत जमातीचा विद्यार्थी न मिळाल्याने ती रिक्त आहे इंग्रजीसाठी केवळ चार विद्यार्थी कमी आहेत तरीही विद्यार्थी कमी असल्याचे कारण देऊन केंद्र बंद करण्याची शिफारस अमरावतीचा द्वेष करणारीच आहे.

नामदार नितीन गडकरी यांनी आपल्या पत्राचा पुनर्विचार करावा. अमरावती आयआयएमसी स्थलांतरीत करण्याऐवजी त्याचा विकास करावा, स्वतंत्र इमारतीची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे अमरावतीच्या भाजपप्रणित खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतून पळविण्यात येत असलेला हा ज्ञान प्रकल्प ना. गडकरी यांच्या जबड्यातून सोडवावा. त्यासाठी आपले वजन खर्ची करावे, अशी मागणी दिलीप एडतकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here