@maharashtracity
मुंबई: शालेय विद्यार्थी तसेच महिला आणि मुलींमध्येही तंबाखू (tobacco) सेवनाचे प्रमाण वाढते आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक असून याबाबत लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली.
महाराष्ट्र राज्याच्या जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण (ग्लोबल युथ टोबॅको सर्वे) च्या आकडेवारीच्या चौथ्या फेरीचे सर्वेक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहाय्याने टाटा मेमोरियल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशन व प्रसार कार्यक्रमात टोपे बोलत होते.
टोपे म्हणाले, तंबाखू सेवन आरोग्याला धोकादायक आहे याची जाणीव असूनही तंबाखू सेवन केले जाते. तंबाखूजन्य उत्पादनाची मागणी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे विधान सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत केले.
या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण, डॉ. राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
टोपे पुढे म्हणाले कि, तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. यावर कोटपा कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र शासन यांच्या अखत्यारीतील इंटरनॅशनल इन्सिट्युट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (आय. आय. पी. एस) द्वारे जीवायटीएस- ४ सर्वेक्षणाची चौथी फेरी १३ ते १५ वर्ष वयोगटातील शाळेत जाणार्या मुलांमध्ये तंबाखूच्या वापराचा राष्ट्रीय अंदाज देण्यासाठी घेण्यात आली.
यापूर्वी २००३, २००६ आणि २००९ या वर्षात सर्वेक्षण घेण्यात आले होते. गेल्या दशकात १३ ते १५ वर्षाच्या मुलांमध्ये तंबाखू वापरात राष्ट्रीय पातळीवर ४२% घट झाली असली तरी अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामसारख्या इशान्येकडील राज्यांमध्ये प्रत्येकी ५८% विद्यार्थ्यांनी तांबाखूचा वापर केल्याचे सर्वेक्षाणाअंती आढळून आले.
महाराष्ट्रात तंबाखू वापर ५.१ टक्के असून राष्ट्रीय स्तरावर ८.५ टक्के आहे. शिक्षण संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीच्या दिशेने तंबाखू विक्रेत्यांच्या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची गरज आहे. ५६% अल्पवयीन मुलेही पान शॉप आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडून सिगारेट बिडी आणि असे तंबाखूजन्य पदार्थ सहजरित्या खरेदी करतात, असे समोर आल्याचेे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घटकाच्या अंमलबजावणीची सर्व भागधारकांची समन्वय साधून करत आहोत. कमी कालावधीत शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण प्रणाली विकसित केली आहे. यात देखील तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत. जीवायटीएस सर्वेक्षणामुळे तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी पुढील उपक्रमांची योजना आखण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक राहील असे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन रामास्वामी यांनी सांगितले.
राज्यात जीवायटीएस सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार कुटुंबात ७.८ टक्के आणि बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी २२ टक्के मुलेही तंबाखू सेकंड हॅन्ड स्मोकच्या संपर्कात येत आहेत. याला समुपदेशनाने आणि कायदेशीर कार्यवाही आणि सर्वांच्या सक्रिय सहभागाने आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्यसेवेच्या संचालक डॉक्टर साधना तायडे यांनी सांगितले.
तर सेंटर फॉर कॅन्सर एपिडमिओलॉजीचे उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले की, तंबाखू हे एकमेव ग्राहक उत्पादन आहे जे प्रत्येक तिसर्या ग्राहकाच्या मृत्यूस जबाबदार ठरत आहे. नवीन ग्राहक म्हणून मुले या तंबाखू लॉबीची लक्ष ठरत आहेत. त्यामुळे संपूर्ण जाहिरातीचे उद्दिष्ट तरुणांना त्यांच्या किलर उत्पादनांमध्ये आकर्षित करण्यासाठी केला जातो. यात बॉलिवूड स्टार्स जाहिराती टोबॅको लॉबीला पाठिंबा देत असल्याने मुले तंंबाखूचे शिकार होत असल्याकडे चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले.