प्रवाशांचे हाल ; कारवाईची मागणी

कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी

एक फेरी जरी न मारल्यास ५ हजारांचा दंड

@maharashtracity

मुंबई: बेस्ट उपक्रमातील कुर्ला, वांद्रे व विक्रोळी या तीन बस डेपोमधील भाडे तत्त्वावरील बस गाड्यांवरील बस चालकांनी (Contractual BEST drivers) कंत्राटदाराने वेतन थकविल्याने मंगळवारी पुन्हा एकदा अचानक संप (strike) केला. त्यामुळे संपापासून बेखबर प्रवाशांचे हाल झाले. त्यांना टॅक्सी, रिक्षाने महागडा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकविणाऱ्या व प्रवाशांच्या हालअपेष्टांना जबाबदार कंत्राटदारावर (contractor) कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संतापजनक बाब म्हणजे गेल्या २१ व २२ एप्रिल रोजीही या कंत्राटदाराच्या बस गाड्यांवरील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन न दिल्याने वांद्रे, वडाळा, विक्रोळी बस डेपोतील कर्मचाऱ्यानी दोन दिवस संप पुकारला होता. आता पुन्हा एकदा वांद्रे, कुर्ला, विक्रोळी, कुर्ला व कुलाबा या बस डेपोतील बस चालकांनी वेतन न मिळाल्याने पुन्हा एकदा सोमवारी सकाळपासून संप पुकारला आहे. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे (commuters) हाल झाले. या प्रवाशांना इच्छित स्थळी ये – जा करण्यासाठी टॅक्सी, रिक्षा या खासगी व महागड्या दराने प्रवास करावा लागला.

वास्तविक, बेस्ट उपक्रमात, एम्. पी. ग्रूपच्या कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर कुलाबा, वांद्रे, कुर्ला, वडाळा व विक्रोळी या पाच बस डेपोच्या माध्यमातून २७५ बसगाड्या सुरू ठेवण्याचे कंत्राटकाम देण्यात आले आहे. मात्र सोमवारी सकाळपासून या पाच बस डेपोमधून १६३ बसगाड्या रस्त्यावर धावल्या नाहीत. त्यामुळे बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूपच हाल झाले. अनेकांना महत्वाच्या कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. त्यांना नाईलाजाने पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी रिक्षा, टॅक्सीने महागडा प्रवास करावा लागला.

दरम्यान, बेस्टने खासगी बसगाड्या पुरवण्याबाबत कंत्राटदाराशी केलेल्या करारानुसार, बस डेपोमधून एकही बस रस्त्यावर न धावल्यास प्रति बसमागे ५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईनुसार किमान ८ लाख १५ हजार रुपये वसुलीची दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘त्या’ कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करा व त्याला काळ्या यादीत टाका

बेस्टसोबत झालेल्या कंत्राटानुसार, बेस्टकडून नियमित कंत्राट रक्कम घेणाऱ्या व बसवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन थकविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे व त्याला काळ्या यादीत टाकण्याची कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे बेस्ट समितीवरील माजी सदस्य सुनील गणाचार्य (BJP Member Sunil Ganacharya) यांनी केली आहे.

कर्मचारी कमी वेतनात प्रामाणिकपणे काम करतात. मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन थकविणाऱ्या कंत्राटदाराकडे कर्मचाऱ्यांनी फुकटात काम करावे, अशी कंत्राटदाराची अपेक्षा आहे का ? बेस्ट उपक्रमातील काही अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराशी साटेलोटे असल्यानेच कंत्राटदाराला बेस्ट उपक्रम त्याचे पैसे देते. यापुढे त्या कंत्राटदाराला त्याचे पैसे न देता त्या पैशातून कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देण्यात यावी, असे सुनील गणाचार्य यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here