@maharashtracity

मजूर सभासद म्हणून दरेकर अपात्र

मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेवर (Mumbai Bank) मजूर सहकारी सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेले प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मजूर मानण्यास सहकार विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे दरेकर यांची बँकेवरील निवडच बेकायदा ठरली असून सलग तीन टर्म बँकेचे अध्यक्षपद भूषवण्याच्या दरेकर यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (MNS) 2106 मध्ये भाजपवासी (BJP) झालेले प्रवीण दरेकर हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू समजले जातात.

मनसेत असल्यापासून दरेकर यांची मुंबै बँकेवर पकड आहे. प्रारंभापासून ते मजूर सोसायटी (labour society) मतदारसंघातून बँकेवर संचालक म्हणून निवडून जात आहेत. डिसेंबर 2019 मध्ये दरेकर यांची विधान परिषद विरोधी पक्ष नेते म्हणून भाजपकडून निवड करण्यात आली. यानंतर आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party – AAP) दरेकर यांच्या मजूर म्हणून असलेल्या नोंदीला आक्षेप नोंदवला.

दरम्यान, मुंबै बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागा जिंकणाऱ्या प्रवीण दरेकरांना निवडणुकीनंतर लगेचच सहकार विभागाने (cooperative department) मोठा दणका दिला. संचालक म्हणून बिनविरोध निवडून गेलेले प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरविले आहे. विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दरेकर हे मजूर म्हणून अपात्र असल्याचा आदेश काढला आहे.

प्रविण दरेकर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील (election affidavit) उत्पन्नासह इतर माहितीवर बोट ठेवत सहकार विभागाने सोमवारी कारवाई केली.

सहकार विभागाने आदेशात नमुद केले आहे की,
मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारीरिक श्रमाची कामे करणारी व्यक्ती असून जिथे उपजीविकेचे प्रमुख साधन मजुरीवर अवलंबून असेल. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आपण उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता दोन कोटी 13 लाख पाच हजार पाचशे रुपये इतकी दाखविलेली आहे. त्यामध्ये आपल्या स्वत:च्या नावे जंगम मालमत्ता 91 लाख दोन हजार इतकी दाखविलेली आहे.

आपण राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून आपणास अंदाजे अडीच लाख (मानधन व भत्त्यासह) मासिक उत्पन्न घेत असल्याचे दिसून येते. त्यावरून प्रथमदर्शनी आपण मजूर असल्याचे दिसून येत नाही. प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्नाचे साधन स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले आहे. त्यात आपण मजुरी करीत असल्याचा कोठेही उल्लेख केल्याचे दिसून येत नाही, असेही सहकार विभागाने नमूद केले आहे.

प्रतिज्ञा मजूर संस्थेचे सदस्य म्हणून पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता आपण धारण करीत नसल्याने आपणास मजूर म्हणून अपात्र घोषित करीत आहे. तसेच संस्थेच्या सदस्यत्वाचा अधिकार दूर करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा उपनिबंधकांना प्राधिकृत करीत आहे, असे बाजीराव शिंदे यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.

मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रविण दरेकर यांच्या मजूर असण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतींकडे तक्रार केली होती. तर दुसरीकडे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं.

दरम्यान, मुंबै बँक निवडणुकीत प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले. त्याचबरोबर त्यांच्या सहकार पॅनेलचाही विजय झाला आहे. असं असतानाच प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे.

दरेकर आव्हान देणार

आपण सहकार विभागाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here