@maharashtracity
मुंबई: वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील घाटकोपर-मानखुर्द या नवीन पण वादग्रस्त ठरलेल्या उड्डाणपुलाचे (Ghatkopar-Mankhurd Flyover) लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे (Coastal Road project) कामही वेगात सुरु आहे. कोविड संसर्गाच्या स्थितीतून सावरुन, नैसर्गिक आपत्तींचा सामना करुनही राज्यात विकास कामांनी वेग धरला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलामुळे प्रवासातील अनावश्यक वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीतूमधूनही सुटका होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उपयुक्त आणि जनहिताचा आहे. जनहिताचे प्रकल्प उभारण्यात मुंबई महापालिकेचा हातखंडा असून त्याबद्दल एक मुंबईकर म्हणून महापालिकेचा मला नेहमी अभिमान वाटतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची प्रशंसा केली.
महानगरपालिकेला आवश्यक ते सर्व सहकार्य आणि पाठबळ राज्य शासनाकडून दिले जाईल, असे अभिवचनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी, राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार मनोज कोटक, राहुल शेवाळे, समाजवादीचे आमदार रईस शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून उपयुक्त आणि आखीव- रेखीव अशी विकासकामे करणे आवश्यक असते. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाने प्रवासातला वेळ वाचवण्याचा विचार केला तसा पुलाच्या आजुबाजूच्या वसाहतींना चांगली घरे देण्यासाठी देखील करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.

नवीन उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्ये
घाटकोपर- मानखुर्द जोडरस्ता हा शीव (सायन) – पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुज-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱ्या वाहनांमुळे नेहमी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता.
त्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्यावतीने हा सुमारे ३ किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. हा उड्डाणपूल शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी. एम. जी. पी. नाला अशा ३ मोठ्या नाल्यांवरुन जातो.
या पुलाची लांबी २.९९१ किलोमीटर तर रुंदी २४.२ मीटर इतकी आहे. उत्तर वाहिनी ३ व दक्षिण वाहिनी ३ अशा एकूण ६ मार्गिका या पुलावर आहेत. या उड्डाणपुलाचे बांधकाम खंडजोड (सेगमेंट) तंत्रज्ञानाने व एकल स्तंभ पद्धतीने केलेले असल्याने पुलाखालील रस्त्याच्या मार्गिका देखील वाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत. महापालिकेमार्फत या उड्डाणपुलासाठी प्रथमतःच अखंड पद्धतीने २४.२ मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
या पुलाच्या निर्मितीसाठी, १ लाख ०२ हजार २२५ घनमीटर काँक्रिट, १७ हजार १७५ मेट्रिक टन लोखंड (रेनफोर्समेंट स्टील), ४ हजार ४८६ मेट्रिक टन संरचनात्मक लोखंड (स्ट्रक्चरल स्टील), १ हजार मेट्रिक टन एच.टी. स्ट्रॅण्ड, ५८६ नग बेअरिंग्स आणि १० हजार ३६२ मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे.